चंद्रपूर: Chandrapur Minor Girls Missing प्रकरणाने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर घटनांची नोंद झाली आहे.
चिमूर, दुर्गापूर आणि जिवती हद्दीतून तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) नुसार गुन्हे नोंदवले आहेत. पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आणि संशयितांविरोधात तपास मोहीम सुरू केली आहे. (हे हि वाचा – शेतमजुराचा माय-लेकीवर हल्ला)
चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १३७(२) अन्वये अज्ञात तसेच संशयित आरोपींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मुलगी शाळेतून घरी परतलीच नाही
पहिली घटना: चिमूर पोलीस ठाणे चिमूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता १० वी मध्ये शिकणारी १४ वर्षे ७ महिने वयाची मुलगी शाळेतून घरी परत आलीच नाही. २४ ऑगस्ट २०२६ रोजी ती नेहमीप्रमाणे स्कूल बसने शाळेत गेली होती. दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर ती बसस्टॉपच्या दिशेने जाताना दिसली, मात्र त्यानंतर ती घरी पोहोचली नाही. नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती न मिळाल्याने वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रभाकर मांगम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: दुर्गापूर पोलीस ठाणे दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत इयत्ता ११ वीत शिकणारी सुमारे १७ वर्षीय मुलगी २४ ऑगस्ट रोजी सकाळी महाविद्यालयात गेली होती. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ऑटोचालक तिला आणण्यासाठी गेला असता ती तिथे मिळून आली नाही. सर्वत्र नातेवाईक व मित्रपरिवारात शोध घेतल्यानंतरही तिचा कोणताही सुगावा न लागल्याने पालकांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पंकज वसाडे पुढील तपास करत आहेत.
तिसरे प्रकरण: जिवती पोलीस ठाणे जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत आश्रमशाळेत शिकणारी १४ वर्षे ७ महिने वयाची मुलगी ऑटोमधून अचानक बेपत्ता झाली. वडील तिला शाळेतून गावी नेण्यासाठी ऑटोत बसवून काही कामानिमित्त थांबले असता, मुलगी ऑटोमधून खाली उतरून निघून गेली आणि घरी परतली नाही. जुन्या ओळखीच्या एका संशयित तरुणाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. या तक्रारीवरून जिवती पोलीस ठाण्यात संबंधित संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






