चंद्रपूर: Chandrapur Missing Girls प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. राजुरा चुनाळा येथील १७ वर्षीय मुलगी आणि प्रकाश नगर येथील १३ वर्षीय नात अचानक बेपत्ता झाल्याने दोन्ही कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन्ही प्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (चंद्रपूरच्या बस स्थानकांवर चोरी करणाऱ्या महिलांना अटक)
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन वेगवेगळ्या अल्पवयीन मुली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणी संबंधित नातेवाईकांनी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या मुलींना आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी राजुरा आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Chandrapur Missing Girls प्रकरणात दोन वेगवेगळ्या घटना
पहिली घटना: राजुरा तालुक्यातील चुनाळा येथून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता
पहिली घटना राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुनाळा येथे घडली आहे. येथील रहिवासी आणि मजुरी काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने राजुरा पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या दोन मुली आणि मुलासह एकाच खोलीच्या घरात राहते. २३ जून २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास सर्व कुटुंबीयांनी एकत्र जेवण केले आणि रात्री १०:०० वाजताच्या दरम्यान घराचा दरवाजा आतून बंद करून सर्वजण झोपी गेले होते. दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच २४ जून २०२६ रोजी सकाळी ५:०० वाजताच्या सुमारास जेव्हा फिर्यादी महिला झोपेतून उठली, तेव्हा तिला तिची १७ वर्षे ५ महिने वयाची मुलगी घरात झोपलेली दिसली नाही. तसेच घराच्या दरवाजाची कडी उघडलेली असून दरवाजा केवळ टेकवून असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
महिलेने तातडीने तिच्या इतर मुलांना उठवून चौकशी केली, मात्र त्यांनी रात्री झोपलेले असल्यामुळे माहिती नसल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने संपूर्ण चुनाळा गावात आणि सर्व नातेवाईकांकडे फोन करून शोध घेतला, परंतु मुलीचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर आपली अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे पाहून आईने राजुरा पोलीस ठाणे गाठून २५ जून २०२६ रोजी तक्रार दिली. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार संजय चौधरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: चंद्रपूर शहराच्या प्रकाश नगर भागातून १३ वर्षीय नात गायब
दुसरी घटना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश नगर, महाकाली कॉलरी परिसरात घडली आहे. येथे राहणाऱ्या एका ५२ वर्षीय महिलेने दिलेल्या तोंडी रिपोर्टनुसार, तिची १३ वर्षे ४ महिने वयाची नात (जी मूळची मनगट्टा, जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड येथील रहिवासी आहे) गेल्या दोन महिन्यांपासून चंद्रपूर येथे तिच्याकडे राहण्यास आली होती. २५ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला खाजगी कामासाठी शहरात गेली होती आणि तिचे पती नेहमीप्रमाणे मजुरीच्या कामावर गेले होते. दुपारी १:३० वाजताच्या सुमारास तिचा लहान मुलगा देखील ऑफिसच्या कामासाठी बाहेर पडला, त्यावेळी नात घरी एकटीच होती.
दुपारी अंदाजे ४:०० वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला आपले काम आटोपून घरी परतली असता, तिला घराचा दरवाजा उघडा दिसला आणि घरात नात मिळून आली नाही. कुटुंबियांनी तात्काळ महाकाली वार्ड, महाकाली मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप आणि संपूर्ण चंद्रपूर शहर परिसरात शोध घेतला, मात्र तिचा कुठेही सुगावा लागला नाही. बेपत्ता मुलीचे वर्णन गोरा रंग, उंची ५ फूट, काळे लांब केस, बारीक डोळे आणि अंगात आकाशी रंगाचा सलवार सूट, कथ्या रंगाची ओढणी व पायजमा असे आहे.
नात अल्पवयीन असल्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची खात्री पटताच २५ जून २०२६ रोजी रात्री चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सुशील सरकार या घटनेचा तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






