चंद्रपूर: Chandrapur Missing Children घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मागील ८ महिन्यांपासून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या घटनांत चिंताजनक वाढ झाली आहे. कौटुंबिक वाद, अभ्यासाचा ताण आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे मुले घर सोडत असल्याचे समोर आले आहे. तथापि, चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक बेपत्ता मुलांचा यशस्वी शोध घेण्यात आला आहे. (हे हि वाचा – चंद्रपुरात क्रूरतेची सीमा, निर्दयी बापाने ८ वर्षीय मुलाची केली हत्या)
दरम्यान, नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याच्या ताज्या घटना समोर आल्या आहेत. दोन्ही प्रकरणांत पालकांनी दिलेल्या तक्रारींवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १३७(२) अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू केला आहे.
१६ वर्षीय मुलगा बेपत्ता
पहिल्या घटनेत, ६ ऑगस्ट रोजी एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा सायंकाळच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेला. तो परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. कोणीतरी अज्ञात इसमाने त्याला फुस लावून पळवून नेल्याच्या संशयावरून ११ ऑगस्ट रोजी गोंडपिपरी तालुक्यातील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दुसरी घटना: अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवल्याचा संशय
दुसऱ्या घटनेत, ९ ऑगस्ट रोजी एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरातून अचानक निघून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला असता, एका ३० वर्षीय ओळखीच्या इसमाने तिला फुस लावून पळवून नेल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी ११ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा गोंडपिपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस यंत्रणेची सतर्कता अन् पालकांना आवाहन
मागील काही महिन्यांत अशा घटनांचे प्रमाण वाढले असले, तरी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने बेपत्ता मुलांच्या तपासासाठी विशेष मोहीम राबवली आहे. पोलीस पथकांच्या तत्परतेमुळे अनेक प्रकरणांचा छडा लावून बेपत्ता मुलांना सुरक्षितपणे शोधण्यात आले आहे.
दोन्ही ताज्या प्रकरणांमध्येही पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून, संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद ठेवावा आणि त्यांच्या दैनंदिन हालचालींवर लक्ष ठेवावे, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






