चंद्रपूर/बल्लारपूर: Chandrapur Ashram School Crime News बल्लारपूर तालुक्यातील आश्रमशाळेत दोन अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्याध्यापक देशमुख यांना निलंबित करण्यात आले आहे. (हे हि वाचा – जुनोना तलाव परिसरात वाद, चाकूने हल्ला)
दरम्यान, हे गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या संचालकांसह कर्मचाऱ्यांवर तात्काळ अटकेची कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी मनसेने केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी विशेष पथकामार्फत सखोल तपासाला सुरुवात केली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात ७ आणि ११ वर्षांच्या दोन अल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. २८ जुलै रोजी घडलेल्या या भीषण प्रकाराचा उलगडा ३ ऑगस्ट रोजी झाला. या प्रकरणात केवळ अत्याचार करणाऱ्यांवरच नव्हे, तर हे पाप दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आश्रमशाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करून पीडित चिमुकल्यांना न्याय देण्याची जोरदार मागणी आता पेटून उठली आहे.
बुधवारी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पीडित बालकांच्या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांसह आपबिती मांडली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
माहिती दडपली; मुख्याध्यापक देशमुख निलंबित
घटनेचे गांभीर्य ओळखून ५ ऑगस्ट रोजी आश्रमशाळा व्यवस्थापनाने प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक देशमुख यांना सेवेतून निलंबित केले आहे. इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही त्याची माहिती पोलीस यंत्रणेला न देता ती दडपून ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एका स्वतंत्र चौकशी समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आश्रमशाळेचे संचालक पंकज पवार यांनी दिली आहे.
मारहाण करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
पीडित विद्यार्थ्यांनी या अत्याचाराची माहिती सुरुवातीला मुख्याध्यापक देशमुख यांना दिली होती. मात्र, त्यांनी मदतीऐवजी ११ वर्षीय बालकाला मारहाण करत ही बाब कोणालाही न सांगण्याची धमकी दिली, असा खळबळजनक आरोप पालकांनी केला आहे.
दरम्यान, ७ वर्षांच्या लहान बालकाला सतत रक्तस्त्राव आणि शारीरिक त्रास सुरू झाल्याने त्याला प्रथम बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलाच्या १३, तर मोठ्या मुलाच्या ३ शिरांना गंभीर दुखापत झाली आहे. या वैद्यकीय अहवालामुळे प्रकरणाची दाहकता उघडकीस आली.
राजुरा प्रकरणाची पुनरावृत्ती
काही वर्षांपूर्वी राजुरा येथील नामांकित शाळेत घडलेल्या अशाच एका काळ्या अध्यायाची आठवण यावेळी झाली. राजुरा प्रकरणात ज्याप्रमाणे केवळ गुन्हेगारांवरच नव्हे, तर बेजबाबदार कर्मचाऱ्यांसह आश्रमशाळेच्या संचालकांवरही थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती, अगदी तशीच कडक आणि निष्पक्ष कारवाई या प्रकरणातही झाली पाहिजे, अशी आक्रमक मागणी यावेळी करण्यात आली आहे.
संस्थेचे संचालक, मुख्याध्यापक आणि वसतिगृह अधीक्षक हे सर्व तितकेच दोषी असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेचे अमन अंदेवार, ॲड. अजित पांडे आणि पीडितांच्या पालकांनी केली आहे.
इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न; न्यायालयीन चौकशीची मागणी
मनसे कामगार सेनेने शंका व्यक्त केली आहे की, या वसतिगृहातील इतर लहान मुलेही अशाच विकृतीचे बळी ठरले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वैद्यकीय चौकशी करण्यात यावी.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ४ ऑगस्ट रोजी कारवा येथील आश्रमशाळेला भेट देण्याचा प्रयत्न केला असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला, ज्यामुळे संस्थेचा संशय अधिक बळावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
२ विधिसंघर्ष बालकांची चौकशी
याप्रकरणी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी माहिती दिली कि २ बालकांवर अनैसर्गिक अत्याचाराच्या प्रकरणात बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणात २ विधिसंघर्ष बालकांचे नाव आल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, आतापर्यंत आश्रमशाळेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांची साक्ष नोंदविण्यात आली असून उर्वरित विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. यापूर्वी असा प्रकार घडला आहे का? याची देखी चौकशी करण्यात येत आहे.
पोलीस तपासाला वेग
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे आणि महिला पीएसआय करिश्मा मोरे यांच्या विशेष पथकाने ४ ऑगस्टच्या रात्रीच कारवा येथील आश्रमशाळेत जाऊन सखोल तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, आता शासन आणि पोलीस प्रशासन दोषींवर कोणती कठोर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






