chandrapur junona lake crime scene and police investigation

चंद्रपूर जुनोना तलाव परिसरात तरुणावर चाकूने हल्ला, ३ जणांवर गुन्हा!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 4, 2026

चंद्रपूर: chandrapur junona lake crime प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरातील जुनोना तलाव परिसरात एका तरुणावर किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला.

पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून आरोपींनी तरुणाचा पाठलाग केला. त्यानंतर त्याच्यावर चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केले. रामनगर पोलिसांनी याप्रकरणी तीन मुख्य आरोपींसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – सिने स्टाईल पाठलाग, एलसीबी ने पकडला गोवंश भरलेला ट्र्क))

मिळालेल्या माहितीनुसार, मारडा येथील रहिवासी अनिकेत संजय सातपुते (वय २७) हा २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी आपल्या मित्रांसोबत जुनोना तलाव येथे ऑटोने फिरायला गेला होता. तलावात आंघोळ केल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास चंद्रपूरकडे परत निघताना पार्किंगच्या जागेवरून बाबूपेठ व जुनोना येथील ओम्या बारसागडे, तुल्या कुमार आणि अक्षय बारसागडे यांच्याशी त्यांचा वाद झाला. भांडण वाढू नये म्हणून अनिकेत व त्याच्या मित्रांनी माफी मागून तेथून काढता पाय घेतला.

मात्र, जुनोना चौकात पोहोचताच आरोपींनी कार आणि मोपेड गाडीने येऊन त्यांना गाठले आणि शिवीगाळ करत मारहाण केली. भयभीत होऊन अनिकेत व त्याचे मित्र तेथून निघून जात असताना, जुनोना जंगल परिसरात आरोपींनी पुन्हा पाठलाग करून ऑटोवर दगडफेक केली. या दगडफेकीत रिक्षाचालकाच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांनी ऑटो थांबवला. यावेळी भीतीपोटी अनिकेतचे मित्र जंगलात पळून गेले.

त्यानंतर कारमधून उतरलेल्या आरोपींनी ऑटोत बसलेल्या अनिकेतवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. आरोपी ओम्या बारसागडे, तुल्या कुमार आणि अक्षय बारसागडे यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने अनिकेतच्या गळ्यावर, हातावर आणि पायावर चाकूने वार केले, तर त्यांच्या साथीदारांनी त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत अनिकेतला रस्त्यात सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर काही मुलांनी जखमी अनिकेतला तातडीने चंद्रपूर येथील शासकीय सामान्य रुग्णालयात दाखल केले. ३ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून रामनगर पोलिसांनी आरोपी ओम्या बारसागडे, तुल्या कुमार, अक्षय बारसागडे आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध बीएनएस २०२३ च्या कलम १०९(१), ११८(१), ३(५), ३२४(४), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत रमेश थिटे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment