मूल (चंद्रपूर): Mul Chandrapur Crime अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोंडाळा खुर्द येथे खाटेवर झोपण्यावरून झालेल्या वादातून चुलत्याने सख्या पुतण्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक वार केले.
या हल्ल्यात पुतण्याच्या मानेवर आणि खांद्यावर खोलवर गंभीर जखम झाली आहे. जखमीवर चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी मूल पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (हे हि वाचा – चिकन ची भाजी लपविल्याने भावाने केली भावाची हत्या)
Mul Chandrapur Crime : बोंडाळा खुर्द येथील रक्तरंजित घटना
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील बोंडाळा खुर्द येथे एका क्षुल्लक वादातून कौटुंबिक नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोरील अंगणात (चाप्यात) असलेल्या खाटेवर झोपण्याच्या आणि घरावरून झालेल्या किरकोळ बाचाबाचीनंतर संतापलेल्या दारुड्या चुलत्याने स्वतःच्या सख्या पुतण्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या रक्तरंजित हल्ल्यात पुतण्याच्या मानेवर आणि खांद्यावर खोलवर वार बसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी मूल पोलिसांनी वृद्ध आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवराव सुधाकर बांगरे (वय ३१ वर्षे, व्यवसाय शेतमजुरी, रा. बोंडाळा खुर्द) हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांच्या घराला लागूनच त्यांचे मोठे वडील (चुलते) श्रीरंग आत्माराम बांगरे (वय ५५ वर्षे/कागदपत्रांनुसार ७० वर्षे) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. देवराव हे नेहमीप्रमाणे मोठ्या वडिलांच्या घरासमोरील अंगणात ठेवलेल्या खाटेवर जाऊन बसत व आराम करत असत. बुधवार, २ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता जेवण आटोपल्यानंतर देवराव नेहमीप्रमाणे चुलत्याच्या घरासमोरील अंगणातील खाटेवर जाऊन आडवे झाले होते. त्यावेळी त्यांची मोठी आई बेबीबाई बांगरे आणि पाहुणी म्हणून आलेली आत्या पार्वताबाई नाहगमकर या जवळच खुर्चीवर बसल्या होत्या.
घरासमोरील खाटेवर झोपण्यावरून पेटला अचानक वाद
रात्री सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास चुलता श्रीरंग बांगरे हा गावातून दारूच्या नशेत घरी आला. त्याने अंगणातील खाटेवर पडलेल्या देवरावला पाहताच ‘तू आमच्या घरी का झोपला?’ असा जाब विचारला. त्यावर देवराव यांनी सहजपणे ‘हे माझे घर आहे’ असे मस्करीत उत्तर दिले. या किरकोळ उत्तराने श्रीरंग बांगरे याचा पारा चांगलाच चढला. त्याने ‘तू नेहमी नेहमी आमच्या घरी का झोपतोस आणि हे माझे घर आहे असे कसे बोललास, तुला आज मारूनच टाकतो’ अशी धमकी दिली. रागाच्या भरात तो घरात गेला आणि लोखंडी पात्याची, बांबूचा (वेळवाचा) दांडा असलेली कुऱ्हाड घेऊन बाहेर आला. काही समजण्याच्या आतच त्याने देवराव यांच्या डाव्या मानेवर कुऱ्हाडीने जोरदार वार केला. हा वार मानेवरून सरकून डाव्या खांद्याला गंभीरपणे लागल्याने मोठा घाव पडला आणि रक्ताची धार लागली.
हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात लथपथ झालेल्या देवराव यांनी कशीबशी तिथून पळ काढत स्वतःचे घर गाठले. घराबाहेर उभा असलेला लहान भाऊ अंकुश याला त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लहान भाऊ अंकुश व शेजारी ज्ञानेश्वर बांगरे यांनी देवराव यांना तात्काळ मोटारसायकलवर बसवून मूल येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, मानेवर आणि खांद्यावर झालेली जखम अत्यंत गंभीर व खोल असल्याने प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना रात्रीच चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गावातील ज्ञानेश्वर बांगरे, जालींदर बांगरे आणि सोमनाथ बांगरे यांनी रुग्णवाहिकेने त्यांना तातडीने चंद्रपूर रुग्णालयात दाखल केले.
चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी देवराव बांगरे यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी थेट मूल पोलीस ठाणे गाठून आपल्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करणाऱ्या चुलत्याविरुद्ध तक्रार नोंदवली. फिर्यादी देवराव बांगरे यांच्या तोंडी तक्रारीवरून मूल पोलिसांनी आरोपी श्रीरंग आत्माराम बांगरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०९(१) (हत्येचा प्रयत्न) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणेदार विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक व्यंकटेश यादवराव दोनोडे करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






