चंद्रपूर: बाबुपेठ हल्ला प्रकरणामुळे चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चिकन दुकानदारावर धारदार शस्त्राने वार झाल्याची तक्रार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुकानदाराच्या घराबाहेर दगडफेक करण्यात आली. घराच्या गेटचे आणि मोटरसायकलचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. या घटनेत सुमारे ८ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. (एकोना माईन्सच्या सुपरवायझरला मारहाण, वाचा बातमी)
बाबुपेठ हल्ला प्रकरण नेमके काय?
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरात भांडण सोडवण्याच्या कारणावरून एका चिकन दुकानदारावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर आरोपींनी दुसऱ्या दिवशी रात्री दुकानदाराच्या घरी जाऊन धिंगाणा घातला, घराच्या गेटवर व मोटरसायकलवर दगडफेक करून अंदाजे ८ हजार रुपयांचे नुकसान केले आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडित तरूणाच्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात चंदू बांसकर, नंदू बांसकर, सुजल, अमोल गड्डमवार आणि गुड्डू दुपारे या पाच जणांविरोधात भारतीय न्याय संहिेतेच्या (बीएनएस) विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भांडण सोडवताना चिकन दुकानदारावर वार
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी ईस्राईल इब्राहीम शेख (वय २३, रा. आंबेडकर चौक, बायपास रोड, बाबुपेठ, चंद्रपूर) हे स्वतःचे चिकन दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आंबेडकर चौक परिसरामध्ये काही मुलांसोबत थांबले असताना, आरोपी चंदू बांसकर, नंदू बांसकर, सुजल, अमोल गड्डमवार आणि गुड्डू दुपारे हे त्या ठिकाणी आले आणि एका अली नावाच्या मुलासोबत वाद घालू लागले.
फिर्यादीने हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या या आरोपींनी वाद सोडून फिर्यादीलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान आरोपी चंदू बांसकर याने फिर्यादीच्या डोक्यात कोणत्यातरी धारदार वस्तूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. दरम्यान, तिथे पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी सुरुवातीला परिसरातील लोकांच्या मध्यस्थीमुळे आणि समजूत काढल्यामुळे फिर्यादीने त्या दिवशी पोलिसात तक्रार दिली नव्हती.
मात्र, या घटनेचा राग मनात ठेवून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे वडील, आई आणि लहान भाऊ जेवण करून घरासमोर उभे असताना वरील सर्व पाचही आरोपी पुन्हा त्या ठिकाणी आले. कालच्या भांडणाचा राग धरून त्यांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यासाठी शिवीगाळ करत उच्छाद मांडला.
आरोपींना पाहताच घाबरलेले कुटूंब त्वरित घरात जाऊन आतील दार लावून बसले. परंतु आरोपींनी घराबाहेर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि “तुझे आज खत्म ही करना है, बाहेर ये,” अशी धमकी देत घराच्या लोखंडी गेटवर लाथा व डंड्याने मारहाण केली. तसेच घराजवळ उभ्या असलेल्या मोटरसायकलवर आणि घराच्या गेटवर मोठे दगड फेकून सुमारे ८ हजार रुपयांचे नुकसान केले. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसत होता. जीवाच्या भितीपोटी फिर्यादीने घरातूनच पोलिसांना फोन करून मदत मागितली, पोलीस येत असल्याचे पाहताच आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून चंद्रपूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






