गडचांदूर – फटाके वाद मारहाण प्रकरणी गडचांदूर पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरपना तालुक्यातील गाडेगाव येथे दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्यावरून वाद झाला. फिर्यादी भारत चौधरी यांच्या तक्रारीनुसार, त्यांना आणि कुटुंबीयांना मारहाण व धमकी देण्यात आली. हे आरोप असून तपास सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव येथे दिवाळीच्या रात्री फटाके फोडण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका गटाने पुनर्वसन समितीच्या अध्यक्षासह त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री उशिरा व पहाटेच्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला असून, नऊ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. (जेवणावरून वाद, किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत, वाचा बातमी)
फटाके वाद मारहाण प्रकरणात नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत बबन चौधरी (वय ३५, रा. गाडेगाव, विरूर, ता. कोरपना, जि. चंद्रपूर) हे मागील तीन महिन्यांपासून गावातील पुनर्वसन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ते गावाच्या विविध समस्या वेळोवेळी पैनगंगा माईन्स गाडेगाव प्रशासनाकडे मांडत असत. मात्र, ते घेत असलेली भूमिका आणि समितीचे अध्यक्षपद गावातील काही व्यक्तींना आवडत नव्हते. यापूर्वी २८ सप्टेंबर २०२६ रोजी याच अध्यक्ष पदाच्या कारणावरून फिर्यादीचे धनराज राजुरकर आणि सुरेश पाचभाई यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता.
गाडेगावात वादाची सुरुवात कशी झाली?
दरम्यान, ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०:१५ वाजताच्या सुमारास फिर्यादी भारत चौधरी हे त्यांचे वडील बबन चौधरी, भाऊ अरुण चौधरी, व त्यांचे कुटुंबीय घरी उपस्थित होते. त्यावेळी घराशेजारील जिल्हा परिषद शाळेजवळ संशयित आरोपी मनीष आवारी, संतोष पाचभाई, सुमित राजुरकर आणि नैतिक राजुरकर हे मोठे आवाज करणारे फटाके फोडत होते. या मोठ्या आवाजामुळे घरच्या लोकांना त्रास होत असल्याने फिर्यादीने त्या मुलांना घराशेजारी फटाके न फोडता इतरत्र जाऊन फोडण्याची विनंती केली. त्यावर संतोष पाचभाई व मनीष आवारी यांनी उद्धटपणे उत्तरे देत “आम्ही तुझ्या घरी फटाके फोडत आहोत का? कोण काय करते, आम्ही इथेच फटाके फोडणार,” असे म्हणत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
विवाद वाढल्यानंतर संशयितांनी फिर्यादीसोबत भांडण करून शिवीगाळ केली आणि हाताबुकीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हा कोलाहल व भांडण ऐकून तिथे सुरेश पाचभाई, धनराज राजुरकर, सुरज पाचभाई, अनिल काळे आणि गणराज राजुरकर हे देखील आले. त्या सर्वांनी मिळून फिर्यादीला मारहाण केली. हा झगडा सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे वडील बबन चौधरी, भाऊ अरुण चौधरी आणि पत्नी यांनादेखील आरोपींनी आपापसात संगनमत करून पाठीवर, पोटावर व हातावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यापुढे तुला जिवंत सोडत नाही आणि मारून टाकू, अशी धमकी देखील यावेळी देण्यात आली.
घटनास्थळी उपस्थित असलेले गावकरी ओमप्रकाश राजुरकर, नितेश नक्षीने, महेश कन्नाके, श्रीकृष्ण कन्नाके, सत्यवान मुटलकर आणि सुनील निखाडे यांनी बीच बचाव करून हा वाद सोडवला. या घटनेत फिर्यादीचे वडील बबन शंकर चौधरी यांना दुखापत झाली असली तरी त्यांना जास्त मार नसल्याने त्यांनी वैद्यकीय उपचारासाठी जाण्यास नकार दिला. या प्रकरणी भारत चौधरी यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून गडचांदूर पोलीस ठाण्यात संतोष पाचभाई, मनीष आवारी, सुरेश पाचभाई, धनराज राजुरकर, सुमित राजुरकर, सुरज पाचभाई, अनिल काळे, नैतिक राजुरकर आणि गणराज राजुरकर (सर्व रा. गाडेगाव, ता. कोरपना) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिेतेच्या (बीएनएस) कलमानुसार मारहाण, शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार सिद्धार्थ रणवीर करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now








1 thought on “दुसरीकडे फटाके फोडा, आम्हाला त्रास होतोयं, विरोध आणि कुटुंबाला मारहाण”