Brahmapuri Crime News संदर्भात ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ब्रम्हपुरीत मध्यरात्री दारूच्या वादातून घरात घुसून तरुणाला मारहाण

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 20, 2026

ब्रम्हपुरी: Brahmapuri Crime News : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरातील सुंदरनगर परिसरात दारू पुरवठ्याच्या वादातून एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. जेवण करत असलेल्या तरुणाला घरातून बाहेर ओढून मारहाण करत चाकूने संपवण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. (जेवणाच्या वादातून वडिलांची हत्या, वाचा हि बातमी)

गडचिरोली जिल्ह्यातील दारू तस्करीच्या ग्राहकांवरून उद्भवलेल्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाला घरातून रस्त्यावर ओढून बेदम मारहाण केल्याची आणि चाकूने मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना ब्रम्हपुरी शहरातील सुंदरनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Brahmapuri Crime News : दारू पुरवठ्याच्या वादातून सुंदरनगरमध्ये वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरनगर, ब्रम्हपुरी येथील रहिवासी ईशांत मोघल डांगे (वय १८) हा मजुरीचे काम करतो. वडिलांची प्रकृती बरी नसल्यामुळे घरखर्च चालवण्यासाठी तो यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू पुरवण्याचे काम करत होता आणि पूर्वी तो दादू घरडे याच्याकडेच हे काम पाहत होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून त्याने दारू पुरवठ्याचे काम पूर्णपणे बंद केले होते.

शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास ईशांत आपल्या घरी जेवण करत असताना गुरुदेव नगर येथील दादू प्रकाश घरडे (वय २८), गांधीनगर येथील काशिम शेख (वय २७) आणि फाशी चौक परिसरातील सौरभ आनंद (वय २२) हे तिघे अचानक त्याच्या घरी धडकले. “तू गडचिरोली जिल्ह्यात आमच्या ग्राहकांना दारूचा पुरवठा का करतोस?” असा जाब विचारत तिघांनी ईशांतसोबत वाद सुरू केला.

घरात घुसून रस्त्यावर ओढत बेदम मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी

हा वाद विकोपाला गेल्यानंतर संशयित आरोपींनी ईशांतला घरातून बाहेर ओढत घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आणले. तेथे त्याला अश्लील शिवीगाळ करत, “तू जिथे भेटशील तिथे तुला चाकूने मारून टाकू,” अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि दादू घरडे याने ईशांतच्या दोन्ही गालांवर जोरदार चापटी मारून मारहाण केली.

त्याच वेळी परिसरातील नागरिक कुंदन सिंग, प्रेमकुमार सिंग आणि प्रिन्स सिंग यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि ईशांतला आरोपींच्या तावडीतून सोडवले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रचंड भीती निर्माण झाल्याने आणि प्रकृती अस्वस्थ असल्याने ईशांत रात्री तत्काळ पोलिसांत जाऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने ब्रम्हपुरी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची आपबिती कथन करत तक्रार नोंदवली.

ईशांत डांगे याच्या तक्रारीवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी आरोपी दादू प्रकाश घरडे, काशिम शेख आणि सौरभ आनंद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९६ (अश्लील कृत्य व शिवीगाळ), ११५(२) (दुखापत करणे), ३३३ (अनाधिकाराने घरात प्रवेश), ३५१(२) (धमकावणे) आणि ३(५) (समान उद्देशाने एकत्रित गुन्हा करणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पुरुषोत्तम भारडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment