Ballarpur Knife Attack crime spot Santoshi Mata Ward

कोर्टातील केस मागे न घेतल्याने सासुरवाडीत तिघांवर चाकू हल्ला; दोन गंभीर

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 2, 2026

बल्लारपूर : Ballarpur Knife Attack प्रकरणी संतोषी माता वॉर्डात अत्यंत धक्कादायक थरार समोर आला आहे. सासुरवाडीत घुसून एका माथेफिरू जावयाने तिघांवर धारदार चाकूने सपासप वार केले.

घटस्फोटाची केस न्यायालयातून मागे घेण्यास नकार दिल्याने हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपीने बहिणीला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या दोन्ही भावांवर गंभीर वार केले. (हे हि वाचा – चंद्रपुरात गॅस चोरी, आप ने केला भांडाफोड)

या हल्ल्यात एका मित्रासह तिघे जण जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवले आहे.

Ballarpur Knife Attack: संतोषी माता वॉर्डात रक्ताचा सडा

न्यायालयात सुरू असलेली घटस्फोटाची केस मागे घेण्याच्या वादातून सासुरवाडीत घुसून तिघांवर चाकूने सपासप वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरातील संतोषी माता वॉर्ड, विश्वशांती चौकात घडली. या रक्तरंजित हल्ल्यात दोन तरुण आणि त्यांचा एक मित्र गंभीर जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर दोघा भावांना तातडीने चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपी शहानवाज हुसेन शेख जमीर व त्याच्या एका साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहितेअंतर्गत (BNS) गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या तक्रारीतील माहितीनुसार, तक्रारदारांच्या मुलीचा विवाह २०२१ मध्ये शहानवाज हुसेन शेख जमीर (रा. रामाळा तलाव रोड, चंद्रपूर) याच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुरळीत चालल्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद आणि मारहाणीचे प्रकार सुरू झाले. सततच्या छळाला कंटाळून तक्रारदारांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी आपल्या मुलीला आणि नातवाला स्वतःच्या घरी बल्लारपूर येथे आणले होते. या प्रकरणात शहानवाज हुसेन शेख जमीरविरोधात चंद्रपूर येथे यापूर्वीही गुन्हा दाखल झाला असून, सध्या न्यायालयात घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याच कारणावरून त्याचा सासरच्या मंडळींवर तीव्र राग होता.

‘मी कोर्टाला मानत नाही’: जावयाची घरात घुसून जबरदस्ती

१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरातील सर्व मंडळी व मुलाचा मित्र घरी उपस्थित होते. त्याचवेळी आरोपी शहानवाज हुसेन शेख जमीर आपल्या एका साथीदारासह ॲक्टिव्हा दुचाकीने तक्रारदारांच्या घरासमोर आला. साथीदाराला घराबाहेर दुचाकीजवळ उभे करून तो थेट घरात घुसला. घरात पाऊल टाकताच त्याने न्यायालयातील केस तात्काळ मागे घेण्याची आणि पत्नीला सोबत पाठवून देण्याची दमदाटी सुरू केली. त्यावर तक्रारदारांनी, न्यायालयात केस सुरू असल्याने जो काही निर्णय होईल तो कोर्टातच पाहू, अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

या उत्तराने संतापलेल्या शहानवाजने, ‘मी न्यायालयाला मानत नाही’ असे म्हणत पत्नीचा हात धरून तिला जबरदस्तीने ओढून नेण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यासाठी तिच्या दोन्ही भावांनी पुढे येऊन त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. याचा प्रचंड राग आल्याने शहानवाजने सर्वांना अश्लील शिवीगाळ करत, ‘एका एकाची लाश पाडीन’ अशी धमकी दिली आणि खिशातून धारदार चाकू बाहेर काढला. त्याने तक्रारदाराच्या मोठ्या मुलाच्या डोक्यावर आणि पोटावर चाकूने जोरदार वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर त्याने लहान मुलावरही चाकूने वार करून त्याला जखमी केले. दोघांना वाचवण्यासाठी त्यांचा मित्र मध्यस्थी करायला धावला असता, शहानवाजने त्याच्या हातावरही चाकूने वार केले.

घरातील तिघांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर शहानवाज हुसेन शेख जमीर बाहेर थांबलेल्या साथीदारासह दुचाकीवरून घटनास्थळावरून पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमींना कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी तात्काळ बल्लारपूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दोघा भावांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

याप्रकरणी जखमी तरुणांच्या वडिलांनी दिलेल्या जबानी तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी शहानवाज हुसेन शेख जमीर व त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(२), ३(५), ३३३ आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मदन भानुदास दिवटे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment