चंद्रपूर: (Chandrapur Crime News) चंद्रपूर शहरातील बाबुपेठ वॉर्ड परिसरात रविवारी एका लग्नकार्यादरम्यान तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू तरुणाने लग्न मंडपात येऊन आधी केटरिंगचे काम करणाऱ्या महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी गेलेल्या कंत्राटदाराच्या मुलासमोर स्वतःच्याच चेहऱ्यावर ब्लेड मारून घेतले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrapur Crime News : केटरिंग महिलांना शिवीगाळ
शहरातील बाबुपेठ वॉर्ड परिसरात रविवारी एका लग्नकार्यादरम्यान तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका माथेफिरू तरुणाने लग्न मंडपात येऊन आधी केटरिंगचे काम करणाऱ्या महिलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, आणि त्यानंतर वाद मिटवण्यासाठी गेलेल्या कंत्राटदाराच्या मुलासमोर स्वतःच्याच चेहऱ्यावर ब्लेड मारून घेत आत्महत्येचा थरार रचला. एवढ्यावरच न थांबता या तरुणाने आपल्या मित्रांना बोलावून थेट लग्न सोहळा असलेल्या घराच्या अंगणात घुसून संपूर्ण कुटुंबाला बंदूक आणि गळा कापून जीवे मारण्याची धमकी दिली. या खळबळजनक प्रकरणानंतर चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. (तलवारीने कापला केक, गुन्हा दाखल)
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मूळच्या रयतवारी परिसरातील मुस्तफा मशीद जवळील रहिवासी असलेल्या सरस्वती गणेश चांदेकर (वय ५५ वर्षे) यांच्या पुतण्याचा म्हणजेच अंकुश शांताराम चांदेकर याचा विवाह सोहळा बाबुपेठ वॉर्डातील सोनामाता मंदिराजवळ असलेल्या रविदास सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या लग्नकार्यात केटरिंगच्या कामाची जबाबदारी सरस्वती चांदेकर यांचा मुलगा विक्रम गणेश चांदेकर याच्याकडे होती. त्याने कामासाठी ८ महिला वेटर म्हणून बोलावल्या होत्या, ज्या विवाहस्थळी पाहुण्यांना जेवण वाढण्याचे काम करत होत्या. सर्व काही सुरळीत सुरू असताना, रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक अज्ञात तरुण तिथे आला आणि काम करणाऱ्या महिलांना विनाकारण शिवीगाळ करू लागला.
महिलांनी तात्काळ या घटनेची माहिती कंत्राटदार विक्रम चांदेकर याला दिली. विक्रमने प्रसंगावधान राखत त्या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याला हॉलच्या बाहेर नेले. मात्र, यामुळे संतापलेल्या त्या माथेफिरू तरुणाने आपल्या खिशातील मोबाईलमधून अचानक एक धारदार ब्लेड काढले आणि सर्वांसमोर स्वतःच्याच चेहऱ्यावर मारून घेतले. स्वतःला जखमी केल्यानंतर त्याने समोर जाऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक आणि दुचाकीवर स्वतःचे डोके आपटण्यास सुरवात केली. हा गंभीर प्रकार पाहून लग्न मंडपातील नागरिक भयभीत झाले. त्यानंतर तो तरुण तिथेच थांबून कोणालातरी फोन करून बोलावू लागला. लग्नकार्यात विघ्न नको म्हणून चांदेकर कुटुंबीयांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि नवरीला घरी नेण्याची तयारी सुरू केली.
परंतु, काही वेळातच त्या माथेफिरू तरुणाचे काही मित्र तिथे गोळा झाले. लग्न हॉलच्या शेजारीच असलेल्या शांताराम चांदेकर यांच्या घराच्या अंगणात या मुलांनी बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि गोंधळ घातला. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला घेरून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच विक्रम चांदेकर आणि त्याची आई सरस्वती चांदेकर यांना उद्देशून, ‘तुम्ही जिथे मिळालं तिथे तुमचा गळा कापून टाकू आणि बंदुकीने थेट उडवून देऊ,’ अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. या आक्रमक हल्ल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तात्काळ ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना पाचारण केले. मात्र, पोलिसांची गाडी घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सर्व आरोपी तिथून पसार झाले.
चांदेकर कुटुंबीयांनी आजूबाजूला चौकशी केली असता, सुरुवातीला राडा करणाऱ्या मुख्य आरोपीचे नाव स्वागत डोहाणे असून त्याच्यासोबत त्याचे इतर गुंड मित्र असल्याचे निष्पन्न झाले. या संपूर्ण धक्कादायक प्रकारानंतर सरस्वती गणेश चांदेकर यांनी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर राहून तोंडी तक्रार नोंदवली. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोपी स्वागत डोहाणे आणि त्याच्या साथीदारांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३५२, ३५१(३), ३५१(२), ३२९(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निशिकांत सुरेंद्र रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग दत्तराव हाके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांनी सांगितले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






