Sword Cake Cutting प्रकरणात शेगाव येथे तलवारीने केक कापणारा आरोपी

सावधान! तलवारीने केक कापताय? चंद्रपूर पोलिसांचा मोठा दणका

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 12, 2026

शेगाव – (Sword Cake Cutting) प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी तलवारीने वाढदिवसाचा केक कापून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत धारदार तलवार जप्त करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.

सार्वजनिक ठिकाणी तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वाढदिवसाचा केक कापून दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाला चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रंगेहात अटक केली आहे. ही धडक कारवाई शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी दुपारी अडीच ते साडेतीन वाजेच्या सुमारास वरोरा तालुक्यातील शेगाव-चंदनखेडा रोडवरील लक्ष्मी लॉनच्या पाठीमागे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी बेकायदेशीरपणे बाळगलेली धारधार तलवार जप्त केली असून, याप्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (६६ लाखांचे अमली पदार्थ भट्टीत जाळले)

Sword Cake Cutting प्रकरणात आरोपी कसा पकडला?

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे पथक चिमुर विभागामध्ये जुगार, दारूबंदी आणि आर्म ऍक्ट अंतर्गत कारवाई करण्यासाठी स्टेशन डायरी सान्हा नोंदवून शासकीय वाहनाने गस्तीवर होते. हे पथक शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, एका गुप्तहेराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, लक्ष्मी लॉनच्या पाठीमागे एक तरुण हातात उघडी तलवार घेऊन फिरत आहे आणि नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहे. माहिती मिळताच पोलीस हवालदार प्रमोद आनंदराव कोटनाके यांनी तात्काळ दोन स्थानिक पंचांना सोबत घेतले आणि पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, नितीन साळवे, नितीन कुरेकार व गजाजन मडावी यांच्यासह घटनास्थळाकडे धाव घेतली.

लक्ष्मी लॉनच्या पाठीमागे पोहोचताच पोलिसांना एक तरुण हातात नंगी तलवार घेऊन उभा असलेला दिसला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला वेढा घालून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव चेतन उर्फ देवा राजू ढोले (वय २४ वर्षे, रा. शेगाव, ता. वरोरा) असे सांगितले. त्याच्या हातात तलवार बाळगण्याचे कारण विचारले असता, त्याने धक्कादायक खुलासा केला. आदल्या दिवशी म्हणजेच ९ जुलै २०२६ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्याचा मित्र प्रणय लोणकर याचा वाढदिवस होता. या वाढदिवसाचे औचित्य साधून शेगाव येथील चंदनखेडा टी-पॉईंट या सार्वजनिक ठिकाणी या दोघांनी याच धारदार तलवारीने केक कापला होता, अशी कबुली आरोपीने दिली. केक कापल्यानंतर ती तलवार त्यांनी परिसरातील झुडपात लपवून ठेवली होती आणि शुक्रवारी तो ती तलवार परत घरी घेऊन जात असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

पोलिसांनी आरोपी चेतन उर्फ देवा ढोले याच्या ताब्यातील ३ हजार रुपये किमतीची लोखंडी धारधार तलवार जप्त केली आहे. या तलवारीची एकूण लांबी ६८.५ सेंटीमीटर असून, तिच्या पात्यावर ‘सिरोही की तलवार ग्यारंटी १०० साल’ असे लिहिलेले आहे. बेकायदेशीर आणि विनापरवाना घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी तसेच सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी चेतन उर्फ देवा राजू ढोले आणि त्याचा फरार मित्र प्रणय लोणकर (दोघेही राहणार शेगाव) यांच्याविरुद्ध शेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ च्या कलम ४, २५ आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह राजेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप अजबराव पोले यांच्याकडे सोपवण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment