वाठोडा देशी दारू जप्त करून पोलिसांनी खोक्यांतील बाटल्यांचा साठा दाखवला

वरोरा तालुक्यातील वाठोडा येथे देशी दारू जप्त; दोघांना अटक, एक आरोपी फरार

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 17, 2026

चंद्रपूर : वाठोडा देशी दारू जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त सुरू असताना गुप्त माहिती मिळाली. त्यावरून वाठोडा येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. तेथे २५ खोक्यांत ९० मिलीच्या २५०० सीलबंद बाटल्या आढळल्या. पोलिसांनी त्यांची किंमत सुमारे १ लाख रुपये सांगितली आहे. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (गडचांदूरात विवाहिता बेपत्ता, शोध सुरु, वाचा हि बातमी)

चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपला धडक मोर्चा सुरूच ठेवला आहे. पोलीस स्टेशन शेगाव हद्दीत गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १६ व १७ ऑक्टोबर २०२६ च्या दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजा वाठोडा येथे धडक कारवाई केली. एका आरोपीच्या घरावर टाकलेल्या या छाप्यात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेली १ लाख रुपये किमतीची ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूची अडीच हजार निपे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी दोन आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

वाठोडा देशी दारू जप्त : गुप्त माहितीवरून छापा

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील उपविभाग वरोरा व चिमूर पथकातील पोलीस कर्मचारी शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आगामी सण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंगदरम्यान पथकाला मौजा वाठोडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर देशी दारूचा साठा लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने कसून तपास करत तात्काळ वाठोडा येथील संशयित ठिकाणावर धाड टाकली. आरोपीच्या घराची बारकाईने झडती घेतली असता, तेथे तब्बल २५ खर्ड्याच्या खोक्यांमध्ये लपवून ठेवलेल्या ९० मिली मापाच्या २५०० नग ‘रॉकेट संत्रा’ देशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. या जप्त केलेल्या दारूच्या साठ्याची बाजारभावाप्रमाणे एकूण किंमत १,००,००० रुपये (एक लाख रुपये) आहे.

दोन आरोपी ताब्यात, एक फरार

पोलीस पथकाने घटनास्थळावरूनच दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये निखिल शेखर जोंगोनी (वय २३ वर्षे, रा. खांबाडा, तालुका वरोरा) आणि प्रवीण मारोतराव सुरसे (वय ३२ वर्षे, रा. बारवा, तालुका वरोरा) यांचा समावेश आहे. या धाडीदरम्यान या बेकायदेशीर दारू तस्करीत मुख्य भूमिका असलेला प्रशांत उर्फ परशु आत्राम (रा. वाठोडा, तालुका वरोरा) हा पोलीस कारवाईचा सुगावा लागताच घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शेगाव येथे आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक ३१५/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, हा दारूचा मोठा साठा नेमका कुठून आणला गेला होता आणि तो कोणाला विक्री केला जाणार होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

जिल्ह्यात अवैध दारू तस्करांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे उपविभाग वरोरा आणि चिमूर पथक अत्यंत सतर्कतेने काम करत असून या कारवाईमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-शेगाव परिसरातील दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. फरार आरोपी प्रशांत उर्फ परशु आत्राम यालाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment