चंद्रपूर: ट्रॅव्हल्समधून दारू जप्त करण्याची कारवाई चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नागपूरहून आलेल्या गणराज ट्रॅव्हल्समधून दारूची वाहतूक होत होती. गोपनीय माहितीवरून पथकाने प्रियदर्शनी चौकात नाकेबंदी केली. बसमधील दोन महिलांच्या बॅगांत विदेशी दारूच्या २३५ सीलबंद बाटल्या सापडल्या. त्यांची किंमत सुमारे ३६,७३० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही महिलांना अटक झाली असून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. एक संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (चंद्रपुरात गणराज ट्रॅव्हल्समधून दारू तस्करी, २ महिलांना अटक, वाचा बातमी)
ट्रॅव्हल्समधून दारू जप्त : प्रियदर्शनी चौकात नाकेबंदी
चंद्रपूर शहरात अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने आपली कडक शोधमोहीम सुरूच ठेवली असून, ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून होणाऱ्या आंतरराज्य दारू तस्करीत मोठा खुलासा केला आहे. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या उपविभाग चंद्रपूर पथकाने प्रियदर्शनी चौक परिसरात सापळा रचून ही धडक कारवाई केली. नागपूरहून आलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसमधून अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोन महिलांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. या महिलांच्या ताब्यातून सुमारे ३६,७३० रुपये किमतीची सीलबंद दारू जप्त करण्यात आली असून, या कारवाईमुळे शहरातील दारू तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गस्तीवर असताना, नागपूर बाजुकडून येणाऱ्या गणराज ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 49 AT 1696) मधून दोन महिला मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर विदेशी दारूचा साठा घेऊन चंद्रपुरात येत असल्याची पक्की गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने प्रियदर्शनी चौक येथे तातडीने नाकेबंदी करत सापळा रचला. ट्रॅव्हल्स बस प्रियदर्शनी चौकात येताच पथकाने बसची पाहणी करून संशयित दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्यांच्या जवळील प्रवासाच्या बॅगांची झडती घेतली असता, त्यामध्ये बॉम्बे व्हिस्कीच्या प्रत्येकी ७५० मिली मापाच्या ४० सीलबंद बाटल्या आणि ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या प्रत्येकी ९० मिली मापाच्या १९५ सीलबंद बाटल्या असा एकूण ३६,७३० रुपये किमतीचा अवैध विदेशी दारूचा साठा आढळून आला.
दोन महिलांना अटक, एक संशयित फरार
पोलीस चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे राजकुमारी धीरज जाट (वय ३६ वर्षे) आणि शिवरात्री संजय जाट (वय ५९ वर्षे, दोन्ही रा. बेलगाव केंजर मोहल्ला, जबलपूर, मध्य प्रदेश) अशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपी महिलांनी सदर विदेशी दारूचा साठा नागपूर येथून आणला असून, तो चंद्रपूर येथील मुख्य सूत्रधार प्रिन्स केंजर (रा. केंजर मोहल्ला, चंद्रपूर) याला विक्रीसाठी देणार असल्याचे सांगितले. कारवाईचा सुगावा लागताच आरोपी प्रिन्स केंजर हा घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
या संपूर्ण कारवाईप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामनगर येथे आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) आणि ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून होणारी ही दारू तस्करी नेमकी कोणाच्या सांगण्यावरून सुरू होती आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे चंद्रपूर शहरातील दारू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






