मॅजिक बुक क्लबच्या संयोजिका यशोदा जांभुळे वाचन प्रेरणा सन्मान स्वीकारताना, मुंबई

भिसीच्या मॅजिक बुक क्लबला शासनाचा वाचन प्रेरणा सन्मान; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्याचा गौरव

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 17, 2026

चंद्रपूर : मॅजिक बुक क्लबला महाराष्ट्र शासनाचा वाचन प्रेरणा सन्मान २०२६ पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील ब्राईट एज फाउंडेशन हा उपक्रम राबवते. भाषा संचालनालय आणि मराठी भाषा विभागाने मुंबईत आयोजित कार्यक्रमात हा गौरव केला. संयोजिका यशोदा जांभुळे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, धनादेश आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संस्थेच्या माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी चार वाचकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाशी आज ३०० हून अधिक वाचक जोडले गेले आहेत. (माता महाकाली महोत्सव, ९ हजार ९९९ कन्यापूजन संपन्न, वाचा बातमी)

मॅजिक बुक क्लबला वाचन प्रेरणा सन्मान प्रदान

ग्रामीण, दुर्गम आणि वंचित भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भिसी येथील ब्राईट एज फाउंडेशनच्या ‘द मॅजिक बुक क्लब’ला महाराष्ट्र शासनाचा ‘वाचन प्रेरणा सन्मान २०२६’ पुरस्काराने गौरविण्यात आले. भाषा संचालनालय व मराठी भाषा विभागाच्या वतीने मुंबई येथील शासकीय विधि महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वाचन प्रेरणा दिन आणि महात्मा ज्योतिराव फुले द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, मराठी भाषा व उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत, सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि भाषा संचालक अरुण गिते उपस्थित होते. ब्राईट एज संस्थेच्या वतीने मॅजिक बुक क्लबच्या संयोजिका यशोदा कोकीळा शेषराव जांभुळे यांनी पुरस्कार स्वीकारला. सन्मानपत्र, धनादेश आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

चार वाचकांपासून ३०० वाचकांपर्यंतचा प्रवास

सात वर्षांपूर्वी चार वाचकांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाशी सध्या ३०० हून अधिक वाचक जोडले गेले आहेत. आतापर्यंत ११० हून अधिक पुस्तकांवर वाचन आणि चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांतील विविध वाचनालयांना एक लाख रुपयांहून अधिक किमतीची पुस्तके, कपाटे आणि आर्थिक मदत संस्थेतर्फे देण्यात आली आहे. ‘मॅजिक अकॅडमी’च्या माध्यमातून आदिवासी व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, निवास आणि भोजनाची सुविधा पुरविली जाते. या उपक्रमाचा चार हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, १२५ हून अधिक विद्यार्थी शासकीय सेवा आणि नामांकित विद्यापीठांपर्यंत पोहोचले आहेत. पुरस्कारातून मिळणारा निधी नवीन पुस्तके खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत एकुडे यांनी सांगितले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “भिसीच्या मॅजिक बुक क्लबला शासनाचा वाचन प्रेरणा सन्मान; ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कार्याचा गौरव”

Leave a Comment