चंद्रपूर येथे महाकाली मंदिर विकास आराखडा बैठकीत आमदार किशोर जोरगेवार अधिकाऱ्यांशी चर्चा करताना

पुरातत्त्व विभागाच्या अटींमुळे महाकाली मंदिर विकास रखडला

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 24, 2026

चंद्रपूर : चंद्रपूर येथील महाकाली मंदिर विकास आराखडा पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार नव्याने तयार करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत वीस कलमी सभागृहात झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. मंजूर ५९ कोटींचा निधी इतर कामांसाठी वळवू दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सुधारित आराखडा ७५ कोटी रुपयांचा असावा, असेही त्यांनी सांगितले. (चंद्रपूर जिल्ह्यातील ३ रेल्व्हे स्थानकाचे होणार नामकरण, वाचा बातमी)

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता महाकाली मंदिर परिसर आणि यात्रा परिसराच्या विकासासाठी मंजूर झालेला ५९ कोटी रुपयांचा निधी कोणत्याही परिस्थितीत इतरत्र वळवू दिला जाणार नाही. या निधीतील एकही रुपया अन्य कामासाठी वापरला जाणार नाही. पुरातत्त्व विभागाच्या नियम व अटींची पूर्तता करून महाकाली मंदिर परिसर विकासाचा सुधारित आराखडा तयार करावा आणि विकासकामे प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या उपस्थितीत वीस कलमी सभागृहात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माता महाकाली मंदिर परिसर विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मंदिर परिसराचे सुशोभीकरण, यात्रा परिसराचा विकास, भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा, भक्त निवास आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.

              यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगळू कुंभार, मनपा आयुक्त नरेश अकुनुरी, महसुल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल कुमार मेश्राम, जिल्हा भुमीलेख अधिक्षक जगताप, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महसुल विभाग, पुरातत्व विभागाचे अधिकारी प्रशांत सोनवने उपस्थिती होते. तसेच यावेळी भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, सविता दंढारे, महिला मोर्चा अध्यक्ष वंदना हातगावकर, बलराम डोडाणी, अजय जयसवाल, नगर सेवक जितेश कुळमेथे, नितेश गवळी, आशा देशमूख, ऋषभ दुपारे, संजय बुरघाटे, अजय वैरागडे, सुधिर कारंगल आदिंची उपस्थिती होती. (आयटीआय च्या प्राचार्याला लाच घेताना अटक, वाचा)

महाकाली मंदिर विकास आराखडा का रखडला?

माता महाकाली मंदिर परिसराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या विकासकामांचा आराखडा दोन वेळा तयार करण्यात येऊनही तो पुरातत्त्व विभागाच्या नियम आणि अटींच्या चौकटीत बसत नसल्याने विकासकामांची प्रक्रिया पुढे जाऊ शकलेली नाही. त्यामुळे आता पुन्हा नव्याने आराखडा तयार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

यासंदर्भात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, माता महाकाली हे चंद्रपूरकरांचेच नव्हे, तर विदर्भासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सव आणि महाकाली यात्रेच्या काळात तर भाविकांची मोठी गर्दी असते. अशा महत्त्वाच्या धार्मिक स्थळाच्या परिसराचा नियोजनबद्ध विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने ५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असताना केवळ आराखड्याच्या तांत्रिक अडचणींमुळे विकासकामे रखडणे योग्य नाही.

पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा पूर्ण आदर राखून विकासकामे करण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या अटी, शर्ती आणि तांत्रिक सूचनांची माहिती घ्यावी. त्यानुसार नियमांच्या चौकटीत बसणारा, भाविकांच्या सुविधांचा विचार करणारा आणि मंदिराच्या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाला साजेसा असा उत्कृष्ट सुधारित ७५ कोटी रुपयांचा आराखडा तयार करावा. यासाठी आवश्यक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून प्रस्ताव तातडीने सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, महाकाली मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना केवळ दर्शनाची सुविधा मिळणे पुरेसे नाही, तर त्यांचा संपूर्ण प्रवास सुखकर आणि सोयीस्कर होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्याच्या विविध भागांतून तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, प्रशस्त परिसर, बैठक व्यवस्था, पार्किंग आणि इतर आवश्यक सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. विशेषतः दूरवरून येणाऱ्या भाविकांना मुक्कामाची योग्य व्यवस्था उपलब्ध झाल्यास त्यांची मोठी सोय होईल. या सर्व बाबींचा विचार विकास आराखड्यात करण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

माता महाकाली मंदिर हे चंद्रपूरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचे महत्त्वाचे केंद्र आहे. या परिसराचा विकास झाल्यास केवळ भाविकांना सुविधा मिळणार नाहीत, तर चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. विदर्भासह महाराष्ट्रातील अधिकाधिक भाविक चंद्रपूरला भेट देतील. त्यामुळे स्थानिक व्यवसाय, छोटे व्यावसायिक, हॉटेल व्यवसाय, वाहतूक आणि रोजगाराच्या संधींनाही बळ मिळेल. महाकाली मंदिर परिसराचा विकास हा केवळ एका धार्मिक स्थळापुरता मर्यादित नसून चंद्रपूरच्या पर्यटन विकासाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी जोडलेला विषय आहे. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार जोरगेवार यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, माता महाकालीच्या मंदिर आणि यात्रा परिसराच्या विकासासाठी आलेला निधी इतर कामांसाठी वळविण्याचा कोणताही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. या विकासासाठी मंजूर झालेला निधी याच कामासाठी खर्च झाला पाहिजे. भाविकांना आवश्यक सुविधा मिळणे, यात्रा परिसराचा नियोजनबद्ध विकास होणे आणि चंद्रपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळणे, हा या निधीमागील मुख्य उद्देश आहे. त्यामुळे निधीचा योग्य विनियोग होऊन प्रत्यक्ष विकासकामे सुरू होईपर्यंत आपण पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाकाली मंदिर परिसर विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुरातत्त्व विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. तांत्रिक अडचणी दूर करून भाविकांच्या हिताचा आणि मंदिराच्या ऐतिहासिक महत्त्वाला साजेसा आराखडा तयार करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.  विकासकामांसाठी महाकाली मंदिराच्या जवळपासची जागा महसुल विभागाने निर्धारित करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या आहे.

यात्रा परिसरात दोन भव्य पाण्याच्या टाक्या उभ्या राहताना पुरातत्त्व विभागाचे लक्ष कुठे होते? महाकाली मंदिर विकास आराखडा

माता महाकाली मंदिर परिसराचा विकास करताना पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मात्र, याच आरक्षित यात्रा परिसरात यापूर्वी दोन भव्य पाण्याच्या टाक्यांची उभारणी करण्यात आली, त्यावेळी पुरातत्त्व विभागाची भूमिका काय होती? त्या बांधकामांच्या वेळी विभागाला आपल्या नियमांची आठवण झाली नव्हती का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित होतो.

मंदिर परिसराच्या विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करताना पुरातत्त्व विभागाच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. मात्र, नियमांची अंमलबजावणी करताना एकसमान निकष असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विकासकामांच्या बाबतीत अडथळे निर्माण होऊ नयेत आणि भाविकांच्या सुविधांसाठी मंजूर झालेला निधी प्रत्यक्षात खर्च व्हावा, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने मार्ग काढणे आवश्यक आहे. माता महाकाली मंदिर परिसराचा विकास हा भाविकांच्या श्रद्धेचा आणि चंद्रपूरच्या अस्मितेचा विषय असून, तो मार्गी लावण्यासाठी ठामपणे पाठपुरावा केला जाईल.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment