चंद्रपूर – गोंडवाना विद्यापीठ परीक्षा शुल्क माफ करण्याचा आदेश विद्यापीठाने जारी केला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीतील दुष्काळसदृश घोषित तालुक्यांतील महाविद्यालयांना तो लागू आहे. हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क माफ होईल. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरूंची ऑनलाइन बैठक झाली. त्यातील निर्णयानुसार हा आदेश निघाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. ज्यांनी शुल्क भरले आहे, त्यांना ते परत मिळेल. महाविद्यालयांनी प्रक्रिया २३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश आहेत. (मॅजिक बुक क्लबचा सन्मान, वाचा बातमी)
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे हिवाळी-२०२६ परीक्षेचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यातील सर्व कुलगुरूंची ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाने हे आदेश जारी केले आहेत.
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. याची गंभीर दखल घेत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. या निर्देशानुसार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे शुल्क माफ करण्यात येणार आहे.
शुल्क परत करण्याबाबत सविस्तर निर्देश
ज्या विद्यार्थ्यांनी हिवाळी-२०२६ च्या परीक्षांसाठी महाविद्यालयांमध्ये आधीच परीक्षा शुल्क जमा केले आहे, अशा विद्यार्थ्यांना ते शुल्क तात्काळ परत करण्याचे निर्देश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. तसेच, हे शुल्क महाविद्यालयामार्फत यापूर्वीच विद्यापीठाकडे जमा झाले असल्यास, विद्यापीठ प्रशासनाकडून ते संबंधित महाविद्यालयांना त्वरित परत केले जाईल आणि महाविद्यालयांनी ते विद्यार्थ्यांना अदा करावयाचे आहे. हे आदेश केवळ दुष्काळसदृश परिस्थिती घोषित असलेल्या तालुक्यातील महाविद्यालयांनाच लागू राहणार आहेत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
२३ ऑक्टोबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
या संपूर्ण प्रक्रियेची अंमलबजावणी वेळेत करण्यासाठी सर्व संलग्नित महाविद्यालयांनी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया येत्या २३ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण करावी, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नवीन परशुराम मुंगळे यांनी केले आहे. या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून विद्यार्थ्यांनी या सवलतीची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






