चंद्रपूर: बल्लारपूर बिबट्याचा हल्ला : विसापूर टोल नाक्याजवळ शनिवारी रात्री ९ वर्षीय कार्तिक बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात बचावला. माता महाकालीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या कुटुंबासोबत तो होता. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, बिबट्याने त्याला उचलून नेले. तासाभराने झुडपातून टाळीचा आवाज आला. नागरिकांनी तिथे जाऊन पाहिले, तर जखमी कार्तिक सापडला. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
“संकट कितीही मोठे असले तरी घाबरून न जाता हिमतीने सामना केल्यास मृत्यूच्या दाढेतूनही बाहेर पडता येते,” ही म्हण बल्लारपूरमध्ये तंतोतंत खरी ठरली आहे. बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात जबड्यात अडकलेल्या ९ वर्षीय बालकाने दाखवलेले प्रसंगावधान आणि जिद्दीमुळे काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सुदैवाने टळली पण बालक जखमी झाला. बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या बालकावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वाचा बातमी)
नेमकी घटना काय?
नवरात्रोत्सवानिमित्त चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेण्यासाठी विविध जिल्ह्यांतून व राज्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात. अनेक नागरिक श्रद्धेपोटी पायदळ प्रवास करून चंद्रपुरात दाखल होतात. हैदराबाद येथून बल्लारपूर येथील आपल्या आत्याकडे आलेला ९ वर्षीय कार्तिक संजय जाधव हा बालकही आपल्या आत्या व इतर कुटुंबीयांसोबत १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास बल्लारपूरवरून पायदळ निघाला होता.
सर्वजण विसापूर टोल नाक्याजवळ पोहोचले असता, अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कार्तिकवर जीवघेणा हल्ला केला आणि त्याला आपल्या जबड्यात पकडून उचलून नेले.
नागरिकांचा पाठलाग आणि शोधमोहीम
अचानक घडलेल्या या थरारक प्रकरणाने परिसरात एकच हाहाकार उडाला. उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत बिबट्याचा माग काढत आरडाओरडा सुरू केला. काही वेळातच घटनास्थळी वनविभाग आणि पोलिसांची चमू दाखल झाली. नागरिकांनी व प्रशासनाने मिळून आजूबाजूच्या परिसरात शोधमोहीम राबवली, परंतु अंधारामुळे कार्तिकचा पत्ता लागला नाही.
टाळीचा तो आवाज आणि जीवदान
घटना घडल्यानंतर तब्बल १ ते २ तासांनंतर, घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका दाट झुडपातून नागरिकांना टाळी वाजवल्याचा आवाज आला. सुरुवातीला कुणीतरी थट्टा किंवा गंमत करत असावी, असे नागरिकांना वाटले. परंतु, टाळीचा आवाज सलग येत राहिल्याने संशय आल्याने नागरिकांनी त्या आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
झुडपात जाऊन पाहिले असता, कार्तिक रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला आढळला. बिबट्याच्या हल्ल्यात त्याच्या गळ्याला व मानेला गंभीर जखम झाली होती, ज्यामुळे त्याला बोलता येत नव्हते किंवा मोठ्याने ओरडताही येत नव्हते. अशा अत्यंत कठीण व वेदनादायी परिस्थितीतही न घाबरता त्याने स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी टाळी वाजवून नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
रुग्णालयात उपचार सुरू
रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या कार्तिकला नागरिकांनी तात्काळ झुडपातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, या थरारक प्रसंगातही लहानग्या कार्तिकने दाखवलेले धैर्य आणि प्रसंगावधान संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे. या घटनेमुळे विसापूर व बल्लारपूर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






