तळोधी वाघाचा हल्ला झालेल्या गिरगाव परिसरातील शेत आणि वनक्षेत्र

वृद्धावर वाघाचा हल्ला, महिलांमुळे वाचला जीव

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 22, 2026

चंद्रपूर (तळोधी): तळोधी वाघाचा हल्ला झाल्याने गिरगाव परिसरात ६५ वर्षीय देवाजी पांडुरंग वाढई जखमी झाले. ते शेतात गवत कापत असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कन्हाडगाव-गिरगाव नाल्यालगत असलेल्या शेतात सकाळी साडेअकराच्या सुमारास हल्ला झाला. जवळ काम करणाऱ्या महिला मजुरांनी आरडाओरडा केल्याने वाघ तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले. जखमी वृद्धांना उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. वन विभागाने घटनास्थळी ट्रॅप कॅमेरे लावले असून परिसरातील गस्त वाढवली आहे. (९ वर्षाच्या मुलाला बिबट्याने उचलले, वाचा बातमी)

तळोधी वाघाच्या हल्ल्यात गिरगावातील वृद्ध जखमी

तळोधी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोविंदपूर उपक्षेत्रातील गिरगाव बिटमध्ये कन्हाडगाव-गिरगाव नाल्या लगत एका शेतकऱ्याच्या शेतात गवत कापण्याचे काम करत असताना एका ६५ वर्षीय वृद्धावर वाघाने अचानक हल्ला करून जखमी केल्याची थरारक घटना घडली आहे. देवाजी पांडुरंग वाढई (रा. गिरगाव) असे जखमी वृद्धाचे नाव असून, या हल्ल्यामुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेतकरी शुल्का अमरसिंग निकुरे यांच्या गट क्रमांक ३३८ मधील शेतात देवाजी वाढई हे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गवत कापण्याचे काम करत होते. यादरम्यान, परिसरावरून जाणाऱ्या एका वाघाने त्यांच्यावर अचानक झडप घालून हल्ला केला. देवाजी यांनी बचावासाठी दिलेली हाक आणि त्यांचा आवाज ऐकून, जवळच जेवण करत असलेल्या आणि धान कापणाऱ्या महिला मजुरांनी तात्काळ धाडस दाखवत त्या दिशेने धाव घेतली. महिलांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे आणि आरडाओरडा केल्यामुळे वाघ तेथून पळून गेला, ज्यामुळे वृद्धाचा प्राण थोडक्यात वाचला.

महिला मजुरांच्या प्रसंगावधानामुळे वृद्धाला मदत

या घटनेची माहिती मिळताच गिरगावचे विनोदभाऊ बोरकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वन विभागाला याची सूचना दिली. माहिती मिळताच तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक जी.एम. हिंगणकर, वनरक्षक पंडित मेकवाड आणि वनरक्षक मइन हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या देवाजी वाढई यांच्या डोक्याला व हातावर वाघाच्या नखांमुळे किरकोळ दुखापत झाली असून, त्यांना तातडीने उपचारासाठी सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वन विभागाने हल्ला करणाऱ्या वाघाचा माग काढण्यासाठी आणि त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तातडीने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. या मदतकार्यात आणि पाहणीच्या वेळी स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जीवे सयाम, अध्यक्ष यश कायरकर व त्यांची टीम, पोलीस निरीक्षक राहुल गुहे, गिरगावचे पोलीस पाटील बोरकर तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या घटनेनंतर वन विभागाकडून परिसरात गस्त वाढविण्यात आली असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी शेतात काम करताना तसेच जंगलालगतच्या परिसरात वावरताना योग्य ती सावधानी बाळगावी, असे आवाहन तळोदीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी यांनी केले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment