चंद्रपूर: चंद्रपूर वाघ हल्ला प्रकरणात चिमूर आणि सिंदेवाही तालुक्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. ३० ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी या दोन घटना घडल्या. चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथे ५५ वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. सिंदेवाही तालुक्यातील धुमणखेडा येथे ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. सिंदेवाहीत आठवडाभरात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही तिसरी घटना आहे. ग्रामस्थांनी वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. (वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार, वाचा बातमी)
चंद्रपूर वाघ हल्ला: चिमूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यात मानवी वस्ती आणि शेतशिवारात वाघांची दहशत दिवसेंदिवस टोकाला पोहोचली असून, मानव-वन्यजीव संघर्षात जिल्ह्यातील बळींचा आकडा वेगाने वाढू लागला आहे. याचाच प्रत्यय आणून देणाऱ्या अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. चिमूर आणि सिंदेवाही तालुक्यात शुक्रवारी (३० ऑक्टोबर) एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या शेतकर्यांचा जागीच बळी गेल्याची थरारक घटना घडली आहे. या मानवी हत्त्यांमुळे शेतकरी वर्गात आणि ग्रामीण भागात प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३८ नागरिकांचा मानव वन्यजीव संघर्षात मृत्यू झाला आहे.
चिमूर तालुक्यात शेतात गेलेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथे घडलेल्या पहिल्या घटनेत, ५५ वर्षीय शेतकरी सदाशिव चिरकुटा खडसंग हे पत्नीसह आपल्या शेतात गेले होते. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शेतालगतच्या जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक झडप घातली. पतीवर वाघाने हल्ला केल्याचे पाहताच पत्नीने केलेल्या हंबरड्याने आणि आरडाओरडीने परिसरातील शेतकरी व शेतमजूर घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत वाघ सदाशिव यांना फरफटत घनदाट जंगलाच्या दिशेने घेऊन गेला होता, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वाघाच्या दहशतीत चंद्रपूर जिल्हा
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर, क्षेत्रसहाय्यक नैताम, राठोड, वनरक्षक अमोल नेवारे तसेच भिसी, शंकरपूर व मुरपार परिसरातील वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच चिमूरचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे यांनीही भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून, वनविभागाकडून मृतकाच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची रोख मदत तात्काळ सुपूर्द करण्यात आली आहे.
सिंदेवाही तालुक्यात आठवडाभरात तिघांचा बळी; धुमणखेडा येथे ७५ वर्षीय वृद्ध ठार
दुसरीकडे, सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नवरगाव उपवन क्षेत्रातील धुमणखेडा येथे वाघाच्या भीषण हल्ल्यात ७५ वर्षीय वृद्धाचा बळी गेल्याची घटना शुक्रवारी (३० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. पत्रु रामाजी मेश्राम (वय ७५, रा. धुमणखेडा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. मृतक पत्रु मेश्राम हे दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावालगतच्या स्वतःच्या शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, शेतात त्यांचा चष्मा, काठी, चप्पल आणि रक्ताचे डाग दिसून आले.
ग्रामस्थांच्या मदतीने वनविभागाने शोधमोهिम राबविली असता, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लगत पत्रु मेश्राम यांचा क्षतविक्षत अवस्थेतील मृतदेह आढळून आला. वाघाने त्यांना शेतातून फरफटत नेत ठार केले. विशेष म्हणजे, सिंदेवाही तालुक्यात अवघ्या एका आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात बळी जाण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २४ ऑक्टोबर रोजी पळसगाव (जाट) येथील नानाजी कामडी आणि २५ ऑक्टोबर रोजी भेंडाळा शेतशिवारात अंगणवाडी सेविका प्रेमीला महाडोरे यांना वाघाने ठार केले होते. या सलग घटकांमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; रोष व्यक्त सध्या शेतात धान कापणी आणि मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच वाघांचे हल्ले वाढल्याने शेतकरी व मजुरांमध्ये जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या तालुक्यात शेतकऱ्यांचे बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थांनी नरभक्षक वाघांचा बंदोबस्त करण्याची, त्यांना जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरे लावण्याची आणि वनविभागाने गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, नागरिकांनी एकट्याने जंगलालगतच्या शेतात जाऊ नये, असे आवाहन वनविभातर्फे करण्यात आले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष पेटला! एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांचा मृत्यू”