त्रिशूल वाघ जेरबंद मोहिमेतील ताडोबा आरआरटी पथक चिमूर

चिमूरमध्ये चार जणांचे बळी घेणारा ‘त्रिशूल’ वाघ अखेर जेरबंद; शेतकऱ्यांना दिलासा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 4, 2026

चिमूर : त्रिशूल वाघ जेरबंद झाल्याने चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. वनविभागाच्या विशेष पथकाने ३ नोव्हेंबर २०२६ च्या रात्री ही मोहीम राबवली. हा सुमारे पाच वर्षांचा नर वाघ चार जणांच्या मृत्यूशी संबंधित असल्याचे वनविभागाने सांगितले. गदगांव बीटमधील कक्ष क्रमांक ३८० मध्ये त्याला डार्ट मारण्यात आला. सध्या वाघाला ब्रह्मपुरी येथील टीटीसी सेंटरमध्ये ठेवले आहे. तेथे त्याच्यावर देखरेख सुरू आहे.

चिमूर तालुक्यात मागील दीड वर्षापासून धुमाकूळ घालत चार मानवी बळी घेणाऱ्या आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण करणाऱ्या ‘त्रिशूल’ या सुमारे ५ वर्षीय नर वाघाला वनविभागाच्या विशेष पथकाने मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी यशस्वीरित्या जेरबंद केले. चिमूर प्रादेशिक वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गदगांव बीटच्या उरकुडपार येथील संरक्षित वन कक्ष क्रमांक ३८० मध्ये ही मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. (मुलमध्ये शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला, वाचा बातमी)

त्रिशूल वाघ जेरबंद: किती बळी?

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत या वाघाने चार जणांचे प्राण घेतले होते. यामध्ये २३ एप्रिल २०२६ रोजी वाहनगांव येथील शंकर मसराम आणि ६ जुलै रोजी नवेगांव पुनर्वसन येथील राजेंद्र भोयर यांना खडसंगी बफर क्षेत्रात या वाघाने आपले शिकार बनवले होते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी, ३० ऑक्टोबर रोजी गरडापार येथील ५० वर्षीय शेतकरी सदाशिव चिरकुटा यांच्यावर याच वन कक्षात दबा धरून बसलेल्या वाघाने प्राणघातक हल्ला करत त्यांना जागीच ठार केले होते. या मानवी हल्यानंतर चिमूर परिसरात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले होते. सध्या शेतात कापूस चुनाईचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर जीव मुठीत धरून काम करण्याचे मोठे संकट उभे ठाकले होते, त्यामुळे या नरभक्षक वाघाला त्वरित जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली होती.

डार्ट ते रिव्हर्सल डोस: मोहिमेचा वेळपट्टा

नागरिकांच्या वाढत्या रोषाची आणि सुरक्षेची गंभीर दखल घेत उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी एस.आर. आणि सहायक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चिमूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देवरकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची आरआरटी (RRT) टीम आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने संयुक्त मोहीम आखली. मंगळवारी ३ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास गदगांव परिसरातील कक्ष क्रमांक ३८० मध्ये वाघाचे अचूक लोकेशन हेरण्यात आले.

अशी पार पडली जेरबंद करण्याची मोहीम ताडोबाच्या वन्यजीव वैद्यकीय अधिकारी तथा रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे आणि आरआरटीचे शूटर अजय सी. मराठे यांनी अत्यंत धाडसाने मोहीम राबवत रात्री ११:४० वाजता वाघाला डार्ट (ट्रॅन्क्विलायझर) मारून बेहोश केले. डार्ट मारल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच रात्री १२:१० वाजता वाघाला सुरक्षितपणे स्ट्रेचरवर घेण्यात आले, १२:२५ वाजता त्याला रिव्हर्सल डोस देण्यात आला आणि १२:२७ वाजता वाघाने पूर्णपणे हालचाल सुरू केली.

मोहिमेत सहभागी असलेले अधिकारी व पथक: या यशस्वी मोहिमेत वन्यजीव वैद्यकीय अधिकारी तथा आरआरटी प्रमुख डॉ. रविकांत एस. खोब्रागडे, शूटर अजय सी. मराठे (RRT TATR), जीवशास्त्रज्ञ राकेश आहुजा (ब्रह्मपुरी) यांच्यासह योगेश लकडे, दिपेश टेंभुर्णे, वसीम शेख, विकास ताजणे, प्रफुल वाटगुरे, अमोल कोरपे, अक्षय दांडेकर आणि गुरुनानक ढोरे या वन व रेस्क्यू पथकातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

जेरबंद करण्यात आलेला हा ‘त्रिशूल’ नावाचा ५ वर्षाचा वाघ सध्या पुढील उपचारासाठी आणि विशेष निगराणीखाली ब्रह्मपुरी येथील टीटीसी (TTC) सेंटरमध्ये हलविण्यात आला असून, या संयुक्त आणि यशस्वी कारवाईमुळे चिमूर परिसरातील जनतेने मोठा दिलासा व्यक्त केला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment