रिम्स व्हेंटिलेटर चोरी प्रकरणी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक

तेलंगणातील चोरीचा धागा चंद्रपुरात? गुन्हे शाखेने आरोपीला शोधून काढले

User avatar placeholder
Written by Prakash Hande

नोव्हेंबर 5, 2026

चंद्रपूर – रिम्स व्हेंटिलेटर चोरी प्रकरणातील संशयिताला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. तेलंगणातील आदिलाबाद येथील रुग्णालयातून चार व्हेंटिलेटर चोरीला गेले होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, या उपकरणांची किंमत सुमारे २० लाख रुपये आहे. चोरी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी झाली होती. संशयिताला अंचलेश्वर वार्ड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या पथकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. (चंद्रपुरात रेती व्यावसायिकाला मारहाण, वाचा बातमी)

रिम्स व्हेंटिलेटर चोरी: आदिलाबादमध्ये काय घडले होते?

तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून सुमारे २० लाख रुपये किमतीचे चार महागडे व्हेंटिलेटर लांबवणाऱ्या चोराचा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला चंद्रपूर शहरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या धडाकेबाज कामगिरीमुळे चंद्रपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

चंद्रपूर पोलिस संशयितापर्यंत कसे पोहोचले?

प्राप्त माहितीनुसार, तेलंगणातील आदिलाबाद येथील राजीव गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अर्थात ‘रिम्स’ (RIMS) या शासकीय रुग्णालयातून गत ३० ऑक्टोबर २०२६ रोजी आरआयसीयू (RICU) तसेच सारी (SARI) व टीबी (TB) वॉर्डमधून अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे चार व्हेंटिलेटर अज्ञात इसमाने चोरून नेले होते. या प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत सुमारे ५ लाख रुपये असून एकूण २० लाख रुपये किमतीच्या या उपकरणांच्या चोरीमुळे वैद्यकीय वर्तुळात आणि प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. या गंभीर घटनेप्रकरणी तेलंगणातील आदिलाबाद-२ (II) टाऊन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूर पोलीस अधीक्षक कार्यालय व स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा समांतर तांत्रिक व गोपनीय तपास सुरू केला. घटनास्थळावरील व परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजचे कसून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे, या गुन्ह्यातील संशयित आरोपी चंद्रपूर शहरातील अंचलेश्वर गेट परिसरात लपून बसल्याची व वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खात्री पटताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने अंचलेश्वर वार्ड परिसरात सापळा रचून सज्जन वसंत मोटे (वय ४५ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, त्याने ‘रिम्स’ रुग्णालयातून व्हेंटिलेटर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीची ओळख पटल्यानंतर आणि कायदेशीर सोपस्कार व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी त्याला पुढील तपास व चोरीला गेलेल्या मालाच्या जप्तीसाठी आदिलाबाद (तेलंगणा) वरून आलेल्या पोलिसांच्या विशेष पथकाच्या स्वाधीन केले आहे.

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस उपनिरीक्षक सुनील गौरकार, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इमरान खान, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, लालु यादव, पोलीस अंमलदार शशांक बादामवार आणि किशोर वाकाटे यांच्या पथकाने पार पाडली आहे. आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद करण्यात चंद्रपूर पोलिसांना मिळालेले हे यश अत्यंत महत्वपूर्ण मानले जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment