वरोरा: वरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रानतळोधी गावाजवळील बामनडोह नाल्यात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर वरोरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास टाकलेल्या या धाडीमध्ये नदीपात्रातून विनापरवाना रेतीचे उत्खनन करणारे चार ट्रॅक्टर, ट्रॅक्टरमधील रेती, मजुरांचे साहित्य असा एकूण २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी चार चालक आणि चार ट्रॅक्टर मालकांविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (महिलेवर दुष्कर्म, आरोपीला जन्मठेप, वाचा बातमी)
वरोरा रेती तस्करी: मध्यरात्री बामनडोह नाल्यात धाड
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार आणि त्यांचे पथक ३० ऑक्टोबर २०२६ च्या सुमारास रात्रीच्या वेळी वरोरा पोलीस ठाणे परिसरात अवैध जुगार, प्रोव्हिहिशन्स आणि अवैध रेती उत्खनन बाबत गस्त घालत पेट्रोलिंग करीत होते. यादरम्यान रानतळोधी गावाजवळील बामनडोह नाल्यात काही इसम ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या माध्यमातून अवैध रितीने रेतीचे उत्खनन करून वाहतूक करीत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मुखबिराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष बामनडोह नाल्याच्या परिसरात पंचांसह लपतछपत धाड टाकली.
पोलिसांच्या पथकाने नाल्याच्या रेतीपात्रात पाहणी केली असता, तिथे चार ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहताच रेती भरणारे मजूर अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र ट्रॅक्टरच्या मंचावर बसलेले चार चालक घटनास्थळीच रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी पळून गेलेल्या मजुरांचा पाठलाग केला, परंतु ते हाती लागले नाहीत. घटनास्थळी पकडलेल्या चालकांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी हरीदास राघोजी देशकर (वय ५०, रा. मजरा, ता. वरोरा), शंकर लक्ष्मण गेडाम (वय २९, रा. परसोडा, ता. वरोरा), अनिल नारायण उईके (वय ४०, रा. चिनोरा खदान, ता. वरोरा) आणि रोशन लिलेश्वर कुरजेकार (वय २६, रा. मजरा, ता. वरोरा) असल्याचे सांगितले.
चार ट्रॅक्टरसह २८ लाखांचा मुद्देमाल जप्त
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी वरोरा परिसरातील अवैध रेती वाहतुकीसाठी वापरले जाणारे वेगवेगळे चार ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज जप्त केल्या. यामध्ये महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ एल ११०४) व लाल रंगाची ट्रॉली आणि रेती असा ७ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, स्वराज ७४४ एक्सटी कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर व ट्रॉली असा ७ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, आयशर ५५१ कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली (क्र. एमएच ३४ एल ५५१५) असा ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि आयशर ४८५ कंपनीचा ट्रॅक्टर (क्र. एमएच ३४ बिव्ही ६९१२) व नीळ्या रंगाची ट्रॉली (क्र. एमएच ३४ एल ६६९१) असा ७ लाख २ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्यासाठी वापरण्यात आलेले १२ पादडे (किंमत २४०० रुपये) आणि १२ प्लास्टिक घमेले (किंमत ३००० रुपये) असा एकूण २८ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
चौकशी दरम्यान पकडलेल्या चालकांना वाळू उत्खननाबाबतचा परवाना विचारला असता त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत कागदपत्रे वा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच आपल्या मालकांनी अवैध रेती उत्खननासाठी या घाटावर पाठवल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रकरणात चालकांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर मालक मनोज गजानन कुरजेकार (रा. मजरा), संजय बापु बल्लम (रा. सेंट ऍनेस कान्व्हेट मागे, वरोरा), सुधाकर रामदास वरभे (रा. गाडगेनगर, वरोरा) आणि ईश्वर रमेश भोंगडे (रा. मजरा) यांच्या सांगण्यावरून हा अवैध प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनिष तालेवार यांच्या फिर्यादीवरून वरोरा पोलीस ठाण्यात आरोपी चालक आणि मालक अशा एकूण आठ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) तसेच सहकलम ४८ महाराष्ट्र महसूल अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील कायदेशीर तपास सुरू आहे. रात्रीच्या सुमारास रेती घाटावर करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






