राजुरा : राजुरा खून प्रकरणात पोलिसांनी मृताच्या ३१ वर्षीय मुलाला अटक केली आहे. वडिलांचा गळा आवळून खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्याने आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी मृतदेहाजवळ तणनाशकाची बॉटल ठेवली. शंकर काळे (वय ५९) यांचा मृतदेह २० मे २०२५ रोजी शेतशिवारात आढळला होता. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू वाटत होता. मात्र शवविच्छेदन अहवालातील निरीक्षणांमुळे तपासाला वेगळी दिशा मिळाली. राजुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला आहे. (महिलेवर दुष्कर्म, आरोपीला जन्मठेप, वाचा बातमी)
राजुरा खून प्रकरण: शेतशिवारात आढळला होता मृतदेह
घरगुती वादातून पोटच्या मुलानेच आपल्या वडिलाचा गळा आवळून खून केल्याची धक्कदायक घटना राजुरा पोलीस ठाणे अंतर्गत उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, खुनानंतर या प्रकरणाला आत्महत्या किंवा अपमृत्यूचे रूप देण्यासाठी आरोपी मुलानेच मृतदेहाजवळ तणनाशक औषधाची बॉटल नेऊन ठेवली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांनी अत्यंत बारकाईने केलेल्या तपासात आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे या गूढ प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, आरोपी मुलावर खुनाचा व पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखील शंकर काळे (वय ३१, रा. धिडसी, ता. राजुरा) असे या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे, तर शंकर परशुराम काळे (वय ५९) असे खून झालेल्या दुर्दैवी पित्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, २० मे २०२५ रोजी राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार्ली येथील शेतशिवाारात शंकर काळे यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्यावेळी त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते आणि विषारी औषधाचा वास येत असल्याने सुरुवातीला हा आकस्मिक मृत्यू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मृतकाच्या मुलानेच दिलेल्या प्राथमिक माहितीवरून राजुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
आत्महत्या वाटावी म्हणून तणनाशकाची बॉटल
घटनास्थळाची पाहणी केली असता फवारणीचे तणनाशक औषध आणि तोंडाजवळ विषारी औषधाचा अंश दिसून आल्याने प्राथमिक तपासामध्ये हा आत्महत्येचा किंवा विषबाधेचा प्रकार वाटत होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे शवविच्छेदन केले. शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा राखून ठेवून रासायनिक विश्लेषणासाठी पाठवला होता. सुरुवातीला व्हिसेरा अहवालामध्ये शरीरात कोणतेही विष नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, शवविच्छेदन अहवालातील सूक्ष्म निरीक्षणांमध्ये गळ्याच्या स्नायूंना दुखापत झाल्याचे आणि हायॉईड हाड आतील बाजूस फ्रॅक्चर झाल्याचे गंभीर वैद्यकीय निष्कर्ष समोर आले.
या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेता, राजुरा पोलिसांनी प्रकरणाची नव्याने चौकशी सुरू केली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय पुन्हा मागवले असता, मृतकात विष प्राशन केल्याचे निष्पन्न झाले नाही, तर गळा दाबल्यामुळे किंवा फासावर लटकल्यामुळे हायॉईड हाड फ्रॅक्चर होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट वैद्यकीय मत डॉक्टर शुभम श्रीवास्तव यांनी दिले. या महत्त्वपूर्ण वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी मृतकाचा मुलगा निखील काळे याला पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
गोफ चोरीच्या संशयावरून वादाला सुरुवात
पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, घटना १९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. घरातील सोन्याची गोफ चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करत आरोपीची आई मंदा काळे हिने मृत वडील शंकर काळे यांच्यासमक्ष निखीलवर आरोप केला होता. यावरून पिता-पुत्रात जोरदार वाद होऊन आपापसात मारामारी झाली होती. त्यानंतर रात्रीच्या सुमारास वडील शेतात राखण करण्यासाठी (जागल) निघून गेले, तर आरोपी मुलगा गावात ट्रॅक्टर चालवून रात्री ११ वाजता घरी परतला. वडिलांनी केलेल्या मारहाणीचा प्रचंड राग मनात धरून निखील रात्री १ वाजताच्या सुमारास शेतात पोहोचला. तिथे झोपलेल्या वडिलांसोबत पुन्हा त्याचा वाद झाला आणि संतापाच्या भरात त्याने वडिलांना खाटेवर पाडून आपल्या दोन्ही हातांनी त्यांचा गळा दाबला.
वडिलांचा मृत्यू झाल्यावर आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी वडिलांचे शव सुबाभळीच्या झाडाजवळील धुरावर नेऊन ठेवले. तसेच शेतात पडलेली तणनाशक औषधाची बॉटल आणून वडिलांच्या तोंडाला औषध लावले आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी बनाव रचला होता. आपण केलेल्या गुन्ह्यावर पडदा पडावा म्हणून त्याने पोलिसांत खोटी तक्रार नोंदवली होती.
पोलिसांनी या प्रकरणी वैद्यकीय अहवाल आणि आरोपीच्या कबुलीजबाबानंतर कायदेशीर पावले उचलली आहेत. राजुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी तथा पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपी निखील शंकर काळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम १०३(१) (खून) आणि २४० (गुन्हा लपविणे व खोटा पुरावा देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई तीव्र करण्यात आली आहे. एका क्षुल्लक कारणावरून आणि रागाच्या भरात पोटच्या मुलानेच जन्मदात्या पित्याचा घात केल्याची ही घटना राजुरा तालुक्यात प्रचंड खळबळजनक ठरली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






