पोंभुर्णा कुटुंबावर हल्ला प्रकरणी पोलीस ठाण्याबाहेरील प्रतिनिधिक छायाचित्र

पोंभुर्णा तालुक्यातील जाम तुकुम येथे कुटुंबावर हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 31, 2026

पोंभुर्णा : पोंभुर्णा कुटुंबावर हल्ला केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पोंभुर्णा तालुक्यातील जाम तुकुम गावात घडली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, शुक्रवारी (३० ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार झाला. फिर्यादी श्रीकांत कामीटवार यांनी शेजाऱ्यांवर मारहाणीचा आरोप केला आहे. तक्रारीनुसार, यात फिर्यादीसह त्यांचे आई-वडील आणि एक आठ वर्षांची मुलगी जखमी झाली. पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपींची बाजू अद्याप समजू शकली नाही. (हत्येला आत्महत्येचा बनाव, मुलाने वडिलांची केली गळा आवळून हत्या, वाचा बातमी)

पोंभुर्णा कुटुंबावर हल्ला: तक्रारीत काय म्हटले आहे?

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या जाम तुकुम गावात एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या कारणावरून आणि जुन्या वादाचा राग मनात धरून दारूच्या नशेत चूर असलेल्या एका इसमाने आपल्या दोन मुलांसह मिळून शेजाऱ्याच्या घरासमोर प्रचंड राडा घातला. लोखंडी काठी आणि हाताबुक्क्यांनी केलेल्या या बेछूट मारहाणीत ठेकेदार असलेल्या तरुण फिर्यादीसह त्याचे वृद्ध आई-वडील आणि अगदी आठ वर्षांची चिमुकली भाची देखील गंभीर जखमी झाली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली असून पोंभुर्णा पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

चौघे जखमी झाल्याची तक्रार

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत रवींद्र कामीटवार (वय २८, रा. जाम तुकुम, पोंभुर्णा) हे ठेकेदारीचे काम करून आपला परिवार चालवतात. त्यांचे वडील जनता विद्यालय पोंभुर्णा येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी यांच्या घराशेजारीच आरोपी सुरेश गणपत सातरे, त्याचा मुलगा संकेत सुरेश सातरे आणि दुसरा मुलगा विनोद सुरेश सातरे हे राहतात. हे आरोपी वारंवार दारू पिऊन विनाकारण शेजाऱ्यांसोबत वाद घालतात आणि भांडण उकरून काढत असतात.

शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी श्रीकांत हे चंद्रपूरवरून आपले काम संपवून कारने (क्र. MH 34 BR 1710) घरी परतले. त्यांनी आपली कार घराच्या बाजूला असलेल्या गेटजवळ उभी केली आणि ते घराकडे जात असतानाच आरोपी सुरेश सातरे हा दारूच्या नशेत तिथे आला. त्याने विनाकारण फिर्यादीच्या पायावर काठीने प्रहार केला. जेव्हा फिर्यादीने त्याला “मला कशाला मारतो?” अशी विचारणा केली, तेव्हा आरोपीने “तू माझ्या मुलाला नोकरीला लावून देतोस का?” असे म्हणत जुना वाद उकरून काढला. त्यावर फिर्यादीने “मी तुझ्या मुलाला नोकरीला लावून देतो असे कधीच म्हटले नाही, मी तर फक्त त्याच्यासोबत गेलो होतो,” असे स्पष्टपणे सांगितले.

पोलिसांनी कोणत्या कलमांखाली गुन्हा नोंदवला?

या स्पष्टीकरणाचा राग आल्यामुळे आरोपी सुरेश सातरे याने त्याचे दोन्ही मुले संकेत सातरे आणि विनोद सातरे यांना सोबत घेऊन थेट फिर्यादीच्या घराचे दार गाठले. तिन्ही आरोपींनी मिळून श्रीकांत यांची कॉलर पकडली आणि त्यांना हाताबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून बीच बचाव करण्यासाठी आलेल्या फिर्यादीच्या आई ज्योती रवींद्र कामीटवार यांच्या पाठीवर आरोपी संकेत सातरे याने काठीने जोरात प्रहार केला. एवढेच नव्हे तर, वृद्ध वडिलांनाही धक्काबुक्की करत खाली पाडण्यात आले.

या दरम्यान भांडण सोडवण्यासाठी आलेली फिर्यादीची अवघ्या आठ वर्षांची चिमुकली भाची ज्ञानेश्वरी ही देखील मध्यभागी आली असता, तिलाही आरोपींनी सोडले नाही. अज्ञानामुळे मध्ये आलेल्या त्या लहान मुलीच्या बोटावरही काठीचा मार बसल्याने ती गंभीर दुखापत झाली. या अमानुष मारहाणीत फिर्यादी श्रीकांत यांच्या हाताला, बोटाला व कमरेला तीव्र दुखापत झाली असून त्यांच्या आईच्या कमरेवरही गंभीर मार लागला आहे. आरोपी सतत दारू पिऊन येऊन कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे संपूर्ण कामीटवार कुटुंबीय प्रचंड दहशतीखाली वावरत आहे.

घटनेनंतर पीडित कुटुंबाने तात्काळ पोंभुर्णा पोलीस ठाण्यात गाठून घडलेल्या प्रकाराची लिखित व तोंडी तक्रार दिली. प्राप्थ तक्रारीवरून पोंभुर्णा पोलिसांनी आरोपी सुरेश गणपत सातरे, संकेत सुरेश सातरे आणि विनोद सुरेश सातरे (सर्व रा. जाम तुकुम) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १११(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेश भाजी निम्गडे हे करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment