पोंभुर्णा – पोंभुर्णा मारहाण प्रकरणात जामतुकुम गावातील एकाच कुटुंबातील तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पैशाच्या जुन्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर त्यांना मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गावातील हनुमान मंदिराजवळ घडल्याचे फिर्यादीने सांगितले. पोंभुर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार नरेश निमगाडे करीत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामतुकुम गावात पैशाच्या व्यवहारावरून झालेल्या वादानंतर एका व्यक्तीला अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. (५ मिनिटात ३ लाख ३० हजार गायब, वाचा बातमी)
पोंभुर्णा मारहाण प्रकरण: जामतुकुम येथे नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुरेश गणपतराव सातरे (वय ४९, रा. जामतुकुम, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) हे मजुरीची कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गावातीलच श्रीकांत रवींद्र कामीडवार (वय २८) याच्यासोबत त्यांचे यापूर्वी पैशाच्या व्यवहारावरून भांडण झाले होते, ज्यामुळे दोघांचे पटत नव्हते. दिनांक ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सुरेश सातरे हे घरी जेवण आटोपून गावातील हनुमान मंदिरा जवळ असलेल्या विजय देऊरमले यांच्या पानठेल्याकडे खर्रा खाण्यासाठी गेले होते. खर्रा घेऊन ते मंदिराशेजारील बाकावर बसले असताना, संशयित आरोपी श्रीकांत कामीडवार हा बाहेरून आपली कार घेऊन आला आणि घराजवळ कार उभी करून खाली उतरला.
त्यावेळी सुरेश सातरे यांनी त्याला जुने पैसे कधी परत देणार, असे विचारले असता श्रीकांत संतापला. त्याने फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत तुझ्यामुळे माझा दिमाग खराब होतो असे म्हणून हाताने गालावर तीन-चार चापट मारल्या आणि त्यांना ओढत स्वतःच्या घरच्या गेटजवळ नेले. एवढेच नव्हे तर, वाद सुरू असताना संशयित आरोपीचे वडील रवींद्र गजानन कामीडवार (वय ५५) आणि आई ज्योती रवींद्र कामीडवार (वय ५०) हे देखील तिथे आले आणि त्या तिघांनी मिळून फिर्यादीची ओढताण करत हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. या संपूर्ण प्रकारादरम्यान घटनास्थळी गावातील गजानन गद्देकार, विलास कस्तुरे, मंगला गद्देकार, अर्चना देऊरमले, बालाजी पिपरे आणि जयश्री गद्देकार हे नागरिक उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी चौकात लोकांसमोर अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पीडित व्यक्तीने पोंभुर्णा पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोंभुर्णा पोलिसांनी संशयित आरोपी श्रीकांत रवींद्र कामीडवार, रवींद्र गजानन कामीडवार आणि ज्योती रवींद्र कामीडवार (सर्व रा. जामतुकुम, ता. पोंभुर्णा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५), ३५१(२), ११५(२) आणि २९६(अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेश भौजी निमगाडे हे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






