ब्रम्हपुरी – ब्रम्हपुरी रोकड चोरी प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून काढलेले ३ लाख ३० हजार रुपये मोटारसायकलच्या डिक्कीतून लंपास झाले. ही घटना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ११ वाजता ब्रम्हपुरी-वडसा मार्गावरील एका आटा चक्कीजवळ घडल्याची तक्रार आहे. फिर्यादीनुसार, लोकमान्य टिळक वाचनालयाचे ग्रंथपाल पैसे काढून चक्कीत गेले असता दोन महिलांनी पैशांची पिशवी नेली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या महिला पांढऱ्या स्विफ्ट डिझायर कारमधून वडसा मार्गाकडे जाताना दिसत असल्याचे सांगण्यात आले. ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलीस उपनिरीक्षक प्रीतमकुमार येरमे पुढील तपास करीत आहेत. (नक्षत्र हॉटेलमध्ये छापा, २० जुगारी ताब्यात.. Read More…)
ब्रम्हपुरी रोकड चोरी: आटा चक्कीजवळ नेमके काय घडले?
चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपुरी शहरात दिवसाढवळ्या चोरीची एक मोठी घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ग्रंथालयाचे काढून आणलेले ३ लाख ३० हजार रुपयांची रोकड असलेली कापडी पिशवी मोटारसायकलच्या डिक्कीतून लांबवून दोन अनोळखी महिला चोरटयांनी पोबारा केल्याची घटना घडली आहे. या दुःसाहसी चोरीमुळे ब्रम्हपुरी शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी चंद्रभान नथ्थुजी पानसे (वय ५७, रा. टिळकनगर, ब्रम्हपुरी) हे लोकमान्य टिळक वाचनालय, बाजार चौक, सराफा लाईन, ब्रम्हपुरी येथे ग्रंथपाल म्हणून नोकरी करतात. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास ते ग्रंथालयाचे सहकाऱ्यासोबत मोटारसायकलने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ब्रम्हपुरी येथे ग्रंथालयाचे पैसे काढण्यासाठी गेले होते. बँकेतून ३ लाख ७० हजार रुपये काढल्यानंतर त्यांनी त्यातील ४० हजार रुपये स्वतःच्या पँन्टच्या खिशात ठेवले आणि उर्वरित ३ लाख ३० हजार रुपयांची रोकड एका कापडी पिशवीत ठेवून ती पिशवी सहकाऱ्याच्या हाताने मोटारसायकलच्या खुल्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर तेथून निघून ते ब्रम्हपुरी ते वडसा हायवेरोडवरील दलाल आटा चक्कीजवळ पोहोचले. त्यांनी आपली मोटारसायकल चक्कीबाहेर उभी करून ते दळणाची पिशवी आणण्यासाठी सकाळी ११:०५ वाजता चक्कीच्या आत गेले. अवघ्या काही मिनिटांतच म्हणजेच सकाळी ११:१० वाजता दळणाची पिशवी घेऊन ते बाहेर आले आणि मोटारसायकलच्या डिक्कीत दळणाची पिशवी ठेवू लागले, तेव्हा त्यांना डिक्कीतील पैशांची पिशवी गायब असल्याचे दिसून आले.
सीसीटीव्हीत दोन महिला आणि स्विफ्ट डिझायर कार
घटना, प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने बाजूला असलेल्या ऑटो गॅरेजमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी केली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अंदाजे २५ वर्षे वयाची, सलवार घातलेली आणि पांढऱ्या रंगाची ओढणी असलेली अनोळखी मुलगी मोटारसायकलच्या डिक्कीतून पैशाची पिशवी बाहेर काढताना स्पष्टपणे दिसून आली. ती मुलगी पिशवी घेऊन तत्काळ समोर उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारकडे पळाली आणि त्या कारमध्ये जाऊन बसली. तिच्या पाठोपाठ साडी घातलेली अंदाजे ३० वर्षे वयाची आणखी एक अनोळखी महिला त्याच कारमध्ये येऊन बसली आणि ती कार वेगाने वडसा मार्गाच्या दिशेने पसार झाली.
दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक चोरीच्या घटनेनंतर ग्रंथपालाने तात्काळ ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून ब्रम्हपुरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३(५) आणि ३०३(२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रीतमकुमार भारत येरमे हे करीत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या दोन्ही महिला चोरट्यांचा आणि स्विफ्ट डिझायर कारचा कसून शोध घेतला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






