सावली – सावली मारहाण प्रकरणात खेडी गावातील एका संशयिताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, जुन्या वादावरून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. ही घटना २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता गावातील रस्त्यावर घडल्याचे फिर्यादीने सांगितले. मारहाणीत उजव्या मनगटाला मार लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फिर्यादीने २३ ऑक्टोबरला तक्रार दिली होती. एक्स-रे रिपोर्ट मिळाल्यानंतर ३१ ऑक्टोबरला सविस्तर तक्रार नोंदवली. पुढील तपास पोलीस शिपाई केवल तुरे करीत आहेत. (५ मिनिटात ३ लाख ३० हजार गायब, गुन्हा दाखल, बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.)
चंद्रपूर जिल्हयातील सावली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खेडी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीला धक्काबुक्की करत बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादीच्या हाताला दुखापत झाली असून एक्सरे रिपोर्ट आल्यानंतर सावली पोलिसांनी या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सावली मारहाण प्रकरण: खेडी येथे नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी दिनेश विठ्ठल गेडाम (वय ६२, रा. खेडी, ता. सावली, जि. चंद्रपूर) हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात आणि खेडी येथे पत्नी, मुलगा, सून व दोन नातवांसह राहतात. त्यांच्या घराच्या मागच्या बाजूस राहणारा वासुदेव सोमा गावळे (वय ५५, रा. खेडी) याला दारू पिण्याची सवय असून तो नेहमी दारू पिऊन येऊन शिवीगाळ करत असतो. दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिनेश गेडाम हे गावातील चौकातून आपल्या घरी परत जात असताना, त्यांच्या घरा जवळील रस्त्यावर संशयित आरोपी वासुदेव गावळे उभा होता. त्याने दिनेश गेडाम यांच्याकडे पाहत जुन्या भांडणावरून अचानक जवळ येऊन, तू दोन महिन्यापूर्वी माझ्यासोबत झगडा भांडण केले होते, असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
फिर्यादीने त्याला आपण आता काहीही बोललो नाही, मग विनाकारण का शिवीगाळ करतोस, असे म्हणून हटकले असता, संतापलेला संशयित आरोपी त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने फिर्यादीला हाताबुक्क्याने मारहाण करत खाली ढकलून दिले, ज्यामुळे उजव्या हाताच्या मनगटाजवळ व भुजेवर मार लागून वेदना होऊ लागल्या. या घटनेनंतर २३ ऑक्टोबर रोजी फिर्यादीने सावली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली होती, त्यावेळी पोलिसांनी त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. डॉक्टरांनी उजव्या हाताच्या मनगटाचा एक्सरे काढण्याचा सल्ला दिला होता, त्यानुसार एक्सरे रिपोर्ट हाती आल्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी फिर्यादीने पुन्हा पोलीस ठाण्यात येऊन सविस्तर तक्रार नोंदवली.
पीडित व्यक्तीच्या तोंडी तक्रारीवरून सावली पोलिसांनी संशयित आरोपी वासुदेव सोमा गावळे (रा. खेडी, ता. सावली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३५२ आणि ११७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिपाई केवल निंबाजी तुरे हे करीत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






