अशोका बार मारहाण प्रकरणाचा तपास करणाऱ्या शेगाव पोलीस ठाण्याची इमारत

४ ऑक्टोबरला तरुणाला मारहाण, तो अजूनही बेशुद्ध

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 9, 2026

शेगाव: अशोका बार मारहाण प्रकरणी शेगाव बु. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुजगव्हान येथे बारच्या गेटसमोर तरुणाला मारहाण झाल्याची तक्रार आहे. जखमी श्यामसुंदर गायकवाड (रा. खानगाव, ता. चिमूर) याच्यावर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्रारीनुसार ही घटना ४ ऑक्टोबर रोजी घडली. वडिलांच्या तक्रारीवरून नेरी येथील रोशन कामडी (वय २८) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे तपास करत आहेत. (गडचांदूरच्या गुन्हे शोध पथकाने असा लावला ट्रॉली चोरी गुन्ह्याचा छडा, वाचा हि बातमी)

४ ऑक्टोबरला नेमके काय घडले?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील खानगाव येथील रहिवासी शालिक चंपत गायकवाड (वय ६२) यांचा मुलगा श्यामसुंदर गायकवाड हा ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी निमढेला येथे एका मयताच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्याच दिवशी दुपारी ५ वाजेच्या सुमारास पंचम रामटेके आणि सदिप नैताम यांनी श्यामसुंदरला दुचाकीवरून खानगाव येथील घरी आणून सोडले. त्यावेळी श्यामसुंदरच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि पायाच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झालेली होती. श्यामसुंदरचा अपघात झाला आहे, असे सांगून ते दोघे निघून गेले. कुटुंबीयांनी तातडीने चारचाकी वाहनाची सोय करून जखमी श्यामसुंदरला उपचारासाठी आधी वरोरा आणि त्यानंतर चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तो आजही बेशुद्ध अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, ६ ऑक्टोबर रोजी शालिक गायकवाड गावात परतले असता, ७ ऑक्टोबरच्या सायंकाळी प्रत्यक्षदर्शी आकाश पाटील याने या प्रकरणातील मूळ सत्य उघड केले. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुजगव्हान येथील अशोका बारच्या गेटजवळ नेरी येथील रहिवासी रोशन कामडी (वय २८) याने श्यामसुंदरसोबत जोरदार भांडण केले होते. रोशनने श्यामसुंदरच्या शर्टची कॉलर व गच्ची पकडून त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर श्यामसुंदर शेतातील बंड्याकडे निघून गेला, तर आरोपी रोशन कामडी हा जवळच उभा होता. अपघाताचे बनाव रचून श्यामसुंदरला घरी पोहोचवण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने जीवे मारण्याच्या उद्देशानेच ही बेदम मारहाण केल्याचे समोर आले.

या धक्कादायक माहितीनंतर जखमी तरुणाचे वडील शालिक गायकवाड यांनी ८ ऑक्टोबर रोजी शेगाव बु. पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोशन कामडी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment