दुर्गापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून असाच एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समोर आला आहे. बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून महिलेची बदनामी केल्याची तक्रार दुर्गापूरमध्ये समोर आली आहे. जुना फोटो वापरून अज्ञात व्यक्तीने बनावट खाते तयार केल्याचा आरोप आहे. या खात्यावर आक्षेपार्ह मजकूर असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. दुर्गापूर पोलीस आणि सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहेत. (तरुणाला मारहाण, ५ दिवसापासून तरुण बेशुद्ध, वाचा बातमी)
बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करून महिलेची बदनामी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित महिलेला ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिच्या होणाऱ्या पतीने फोन करून तिच्या नावाने नवीन इंस्टाग्राम आयडीवरून रिक्वेस्ट आल्याचे सांगितले. मात्र, पीडितेची आधीपासूनच एकच अधिकृत इंस्टाग्राम आयडी असून दुसरी कोणतीही आयडी नसल्याचे तिने स्पष्ट केले. संशय आल्याने तिने मोबाईलवर शोध घेतला असता, एका भामट्याने तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार केल्याचे उघडकीस आले.
या बनावट आयडीच्या प्रोफाईलवर पीडित महिलेचा जुना फोटो लावून ‘बायो’मध्ये हॉटेलमधील वास्तव्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर लिहिला असल्याचे दिसून आले. जाणीवपूर्वक आणि वाईट उद्देशाने स्वतःची सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्यासाठीच हे कृत्य करण्यात आल्याचे लक्षात येताच पीडितेने दुर्गापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित महिलेच्या तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (C) अंतर्गत (बनावट डिजिटल ओळख तयार करणे) गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गापूर पोलीस व सायबर सेल पथक या बनावट आयडीचा आयपी (IP) ॲड्रेस शोधून आरोपीचा सुगावा लावण्याचा पुढील सखोल तपास करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






