दुर्गापूर (चंद्रपूर): दुर्गापूर मजुरावर हल्ला झाल्याची घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. मजुरीचे हक्काचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या २३ वर्षीय तरुणावर कंत्राटदारासह तिघांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाच्या डोक्यावर लोखंडी व्हील पान्याने मारण्यात आले. तसेच लोखंडी रॉडनेही मारहाण करण्यात आली. तरुणाला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही धक्काबुक्की करून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध BNS अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (वेकोलि कर्मचाऱ्यांची फसवणूक, वाचा हि बातमी)
दुर्गापूर मजुरावर हल्ला नेमका कसा झाला?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लखमेंदरसिंग दिलबादसिंग संधु (वय २३, रा. वार्ड क्र. ३, दुर्गापूर) हा तरुण मजुरीचे काम करतो. काही दिवसांपूर्वी तो दुर्गापूर येथील कंत्राटदार आकाश मानकर याच्यासोबत उत्तर प्रदेश (बिहार) येथे बॉयलर वेल्डिंगच्या कामासाठी ५५० रुपये रोजंदारीवर गेला होता. काम पूर्ण झाल्यानंतर सर्व मजूर आपल्या गावी दुर्गापूर येथे परत आले. कंत्राटदाराने कंपनीकडून पैसे उचलले आणि इतर मजुरांचे पैसे दिले, परंतु लखमेंदरसिंग याच्या हक्काची मजुरी दिली नाही.
रविवारी, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास लखमेंदरसिंग मजुरीचे पैसे मागण्यासाठी आकाश मानकर याच्या घरी गेला असता त्याला सायंकाळी ६ वाजता येण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे सायंकाळी लखमेंदरसिंग पुन्हा गेला असता आकाश मानकर याने पैसे न देता त्याला शिवीगाळ करत हाताबुक्कीने मारहाण केली.
यानंतर सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास कंत्राटदार आकाश मानकर हा त्याचे दोन मित्र करण आणि लक्की यांना सोबत घेऊन लखमेंदरसिंग याच्या घरी पोहोचला. त्या वेळी आकाशच्या हातात लोखंडी व्हील पाना आणि उर्वरित दोघांच्या हातात लोखंडी रॉड होते. त्यांनी पैशांच्या कारणावरून लखमेंदरसिंगशी वाद घालून आकाश मानकर याने लोखंडी व्हील पाना लखमेंदरसिंगच्या डोक्यावर मारला. तर करणने लोखंडी रॉडने त्याच्या डाव्या बरगडीवर आणि लक्कीने पाठीवर वार केले. यात लखमेंदरसिंगच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्त वाहू लागले.
मारहाण होत असल्याचे पाहून लखमेंदरसिंगची आई त्याला सोडवण्यासाठी मध्ये आली असता आरोपींनी तिलाही धक्काबुक्की केली आणि “तुझ्या मुलाला सोडणार नाही, जीवाने मारून टाकू” अशी धमकी दिली.
या प्रकरणी लखमेंदरसिंग संधु याच्या मौखिक तक्रारीवरून दुर्गापूर पोलिसांनी आरोपी आकाश मानकर, करण आणि लक्की या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११८(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार जाकीर सलाम कुरेशी करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






