पैशांच्या वादातून मारहाण प्रकरणी राजुरा येथील विरूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पैशांच्या वादातून मारहाण; विरूर पोलिसांत दोन्ही गटांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 28, 2026

चंद्रपूर: पैशांच्या वादातून मारहाण झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील मुंडीगेट येथे २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी घडली. दोन गटांत झालेल्या या वादानंतर विरूर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

दोन्ही बाजूंनी पोलिसांत स्वतंत्र तक्रारी दिल्या आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस हवालदार मंगला मेश्राम पुढील तपास करत आहेत. तक्रारींतील आरोप न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे. (चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर गुन्हे दाखल, वाचा हि बातमी)

चंद्रपूर जिल्ह्यातील विरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंडीगेट (राजुरा) येथे पैशांच्या व्यवहारावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन मारामारी झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी दिलेल्या तक्रारींवरून विरूर पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.

पैशांच्या वादातून मारहाण: मुंडीगेटमध्ये वादाची सुरुवात कशी झाली?

पहिल्या प्रकरणात, मुंडीगेट येथील रहिवासी व बिल्डिंग मटिरिअल सप्लाय व ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आदित्य शंकर भुक्या (वय २५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी तीन ते चार महिन्यांपूर्वी गावात राहणारे गणेश सकू लाखावत यांच्या घराच्या बांधकामासाठी ६,५०० रुपयांची गिट्टी टाकली होती. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास आदित्य यांनी गिट्टीच्या उर्वरित पैशांची मागणी करण्यासाठी गणेश लाखावत यांना फोन केला असता, गणेश यांनी फोनवर उद्धटपणे बोलून शिवीगाळ केली व घरी येण्याचे आव्हान दिले.

आदित्य भुक्या यांच्या तक्रारीत काय आरोप आहेत?

आदित्य गणेश यांच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता, गणेश लाखावत, त्यांचा लहान भाऊ गगण सकू लाखावत आणि नरेश रामचंद्र लाखावत या तिघांनी मिळून आदित्य यांना पकडून बांबूच्या काठीने तसेच हाताबुक्क्यांनी डोक्यावर, पायावर व पोटावर मारहाण केली. वाद सोडवण्यासाठी आदित्य यांचे आई-वडील, भाऊ व बहीण आले असता, आरोपींनी आदित्य यांच्या बहिणीला चापट मारून काठीने हातावर मारले, तसेच वडील व भावालाही मारहाण केली.

त्यानंतर गावातील लोकांनी मध्यस्थी करून वाद सोडवला. मात्र, आदित्य कुटुंबीय घरी परतल्यानंतर गणेश लाखावत, गगण लाखावत, नरेश लाखावत आणि त्यांची काकू तारा रामचंद्र लाखावत यांनी पुन्हा त्यांच्या घरासमोर येऊन अश्लील शिवीगाळ करत धमक्या दिल्या. याप्रकरणी आदित्य भुक्या यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश लाखावत, गगण लाखावत, नरेश लाखावत आणि तारा लाखावत यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम २९६, ११५(२), ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गणेश लाखावत यांच्या तक्रारीत काय म्हटले आहे?

दुसऱ्या प्रकरणात, गणेश सकू लाखावत (वय २४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आदित्य शंकर भुक्या यांच्याकडून काही महिन्यांपूर्वी शेती विकत घेतली होती, ज्याचे ३,००० रुपये दिले असून ५०० रुपये देणे बाकी होते. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजेच्या सुमारास आदित्य भुक्या यांनी फोन करून उर्वरित पैशांसाठी शिवीगाळ केली. थोड्या वेळाने आदित्य भुक्या, त्यांचे वडील शंकर भुक्या, मोठा भाऊ अनिकेत भुक्या व नातेवाईक गणेश यांच्या घराबाहेर आले व पैशांची मागणी करत वाद घालू लागले. गणेश यांनी आई-वडील पुढील आठवड्यात परत आल्यावर पैसे देतो असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तिघांनी मिळून गणेश यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली, दगडाने त्यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या आणि दुचाकीचे डोम फोडून नुकसान केले. वसंत अजमेरा, रूपेश अजमेरा, सूरज बानोत व रोशन भुक्या यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवल्यानंतर गणेश घरात गेले असता, आदित्य व अनिकेत यांनी घरात घुसून पुन्हा मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गणेश लाखावत यांच्या या तक्रारीवरून विरूर पोलिसांनी आदित्य शंकर भुक्या, शंकर भुक्या व अनिकेत शंकर भुक्या यांच्याविरुद्ध बीएनएस २०२३ च्या कलम ३३३, ११५(२), २९६, ३(५), ३२४(४) व ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विरूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र देविदास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगला पांडुरंग मेश्राम या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment