चंद्रपूर : चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर विनापरवानगी मिरवणूक काढून शहरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जटपुरा गेट येथील ‘चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ’ आणि प्रशासनाला पूर्वकल्पना न देता पुन्हा विसर्जन मिरवणूक काढली, ज्यामुळे रुग्णवाहिका व नागरिकांच्या मार्गावर प्रचंड कोंडी झाली. नागरिकांच्या तक्रारींनंतर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत रामनगर पोलीस ठाण्यात मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. (चंद्रपूर गणेश विसर्जन सोहळ्यात राजकीय शो बाजी, वाचा पक्षातील गटबाजीची बातमी)
चंद्रपूरचा राजा गणेश मंडळावर गुन्हा नेमका का दाखल झाला?
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहर, रामनगर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक गणेश मूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडत होती. या मिरवणुकीत ‘चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ’ देखील सहभागी झाले होते. मात्र, मिरवणूक जटपुरा गेट येथे पोहोचल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आतिशबाजी केली, ज्यामुळे मागे असलेल्या इतर गणेश मंडळांच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती हाताळली आणि मंडळाला विसर्जन मार्गाकडे रवाना केले. परंतु, या मंडळाने विसर्जन न करता श्रींची मूर्ती परस्पर माघारी नेऊन पुन्हा मंडपात ठेवली.
विनापरवानगी मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी
त्यानंतर २६ सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील सुमारे ५० सार्वजनिक गणेश मूर्तींची नियोजित विसर्जन मिरवणूक निघणार होती. तत्पूर्वी, दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास ‘Chandrapurcha Raja’ मंडळाने पोलीस व प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि परवानगी न घेता अचानक पुन्हा विसर्जन मिरवणूक काढली. यामुळे मुख्य विसर्जन मार्गावर इतर मंडळांसाठी मोठा अडथळा निर्माण झाला. मुख्य म्हणजे दवा बाजार, केवळराम चौक, रामसेतू पूल ते विसर्जन पॉइंट हा रस्ता रुग्णवाहिका, नागरिक आणि दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. विनापरवानगी काढलेल्या या मिरवणुकीमुळे या प्रमुख मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली, ज्याबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या.
इतकेच नव्हे तर, विसर्जन स्थळी पोहोचल्यानंतरही मंडळाच्या वतीने विसर्जनासाठी तब्बल २ ते ३ तास विनाकारण वेळ घालवण्यात आला, ज्यामुळे मागाहून येणाऱ्या इतर सार्वजनिक गणेश मंडळांना ताटकळत राहावे लागले व त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकारामुळे इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता मिरवणूक काढणे तसेच विसर्जनास अवाजवी विलंब लावल्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेतली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अप. क्र. ११३६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम २२३, २८५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १३५ व १३८ अन्वये ‘चंद्रपूरचा राजा गणेश मंडळ, जटपुरा प्रभाग’च्या पदाधिकारी व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






