मूल – मूल डीजे कारवाई अंतर्गत पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाबद्दल चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात २४ ऑक्टोबर रोजी शारदा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या. पोलिसांनी सांगितल्यानुसार, गस्तीदरम्यान ध्वनीमापक यंत्राने तपासणी करण्यात आली. त्यात अनेक डीजेचा आवाज निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळला.
या प्रकरणी चार मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. (डीजे बंद केल्याचा राग, पोलीस पाटलाला शिवीगाळ. वाचा हि बातमी)
मूल डीजे कारवाई: चार मंडळांवर कोणते गुन्हे दाखल?
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात शारदा व दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी कर्णकर्कश डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या आणि प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध मंडळांचे अध्यक्ष तसेच डीजे चालकांविरुद्ध धडक कारवाई करत चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी आणि रात्रीच्या सुमारास मूल शहरात विसर्जन मिरवणुका सुरू असताना पोलिसांनी केलेल्या या पेट्रोलिंग व तपासणी दरम्यान निर्धारित मर्यादेपेक्षा कैक पटीने अधिक तीव्रतेने डीजे वाजवले जात असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३८ आणि १३६ अन्वये कायदेशीर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
महात्मा फुले चौकात १०० डेसिबलपेक्षा जास्त आवाज
मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनाक्रमात महात्मा फुले चौक ते गांधी चौक दरम्यान परमेवरी दुर्गा मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर आणि पिकअप ट्रॅकवर लावून MG पॉवर डीजे, पायल धुमाल आणि ब्लास्टर डीजे वाजवले जात होते. पोलिसांच्या पथकाने ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी केली असता या डीजेची ध्वनी तीव्रता १०२.५ डेसिबल, ११२.८ डेसिबल आणि ९८.०२ डेसिबल इतकी प्रचंड असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही डीजे मालक व चालकांनी आवाज कमी केला नाही. याप्रकरणी परमेवरी दुर्गा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मुरलीधर खानोरक, डीजे चालक पंकज गणपत नैताम, उमेश महादेवजी हुन्डे आणि रोहित विजय जुमडे यांच्यावर मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाग मंदिर चौक आणि ताडाळा रोडवरील कारवाई
दुसऱ्या कारवाईत, नाग मंदिर चौक वार्ड क्रमांक १६ येथे नाग गणेश शारदा महिला मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत बोलेरो पिकअप वाहनावर व्हीआयपी प्लस ७७ नावाचा डीजे अत्यंत कर्णकर्कश आवाजात वाजविला जात असल्याचे निदर्शनास आले. ध्वनीमापक यंत्राच्या साहाय्याने तपासणी केली असता या डीजेचा आवाज ९८.४६ डेसिबल आढळला. पोलीस प्रशासनाने आवाज कमी करण्यास सांगितल्यानंतरही चालकाने दुर्लक्ष केले. या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षा सौ. वैशाली सचिन घुगरे आणि डीजे चालक यश विश्वास बोल्लीवार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तिसऱ्या घटनेत, आंबेडकर चौक ताडाळा रोड परिसरात सरस्वती शारदा महिला मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाटा योद्धा पिकअप गाडीवर ‘साईबाबा डीजे’ ९४.३९ डेसिबल इतक्या तीव्र आवाजात वाजवला जात असल्याचे पोलिसांच्या गस्ती पथकाला आढळले. पोलीस कर्मचाऱ्यांनी आवाज कमी करण्यास सांगितले असता डीजे चालक सुजित शरद रेड्डीवार याने त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षा पुल्लाबाई विष्णू वालकोंडे आणि चालक सुजित शरद रेड्डीवार यांच्यावर मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या कारवाईत, महात्मा फुले चौक परिसरात सार्वजनिक महिला मंडळ वार्ड क्रमांक १ च्या विसर्जन मिरवणुकीत टाटा १११० मिनिट्रक गाडीवर ‘गणराया डीजे’ ९४.४० डेसिबल आवाजात लावून नियमांचे उल्लंघन केले गेले. पोलिसांच्या सूचनेनंतरही डीजे चालक मनीष अशोक खोब्रागडे याने आवाज कमी केला नाही. या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षा नंदिनी गणेश रामशेट्टीवार आणि चालक मनीष अशोक खोब्रागडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे. मिरवणुकीदरम्यान प्रचंड गर्दी असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळावर तात्काळ डीजे साहित्य जप्त केले नसले, तरी मिरवणूक संपल्यानंतर कारवाईच्या भीतीमुळे संबंधित डीजे वाहने व चालक पळून गेले. पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या या कठोर कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष बाब म्हणजे जिल्ह्यात आतापर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेवर सर्वाधी कारवाई मूल पोलिसांतर्फे करण्यात आली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






