मूल: मूल डीजे कारवाईत पोलिसांनी दुर्गा विसर्जन मिरवणुकीतील डीजे वाहनांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ध्वनीमापक यंत्राच्या तपासणीत आवाज विहित मर्यादेपेक्षा जास्त आढळला. ही मिरवणूक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मूल शहरात निघाली होती. सूचना देऊनही आवाज कमी न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा नोंदवून पाच वाहनांसह ८५ लाख २१ हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपींमध्ये मंडळाचे अध्यक्ष आणि डीजे मालक-चालकांचा समावेश आहे. (उत्सवाच्या आनंदात शेतकरी कुटुंबाला आधार, वाचा बातमी)
दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या डीजे मालक व आयोजकांवर मूल पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख २१ हजार रुपये मूल्याची डीजे साहित्यासह वाहने जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषणाचे काटेकोर पालन व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय आणि स्थानिक पोलिसांकडून ही महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे.
मूल डीजे कारवाई : गांधी चौकात काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील मूल पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुर्गा देवी विसर्जन मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषण नियमांच्या उल्लंघनावर आळा घालण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदारांमार्फत विशेष गस्त व तपासणी मोहीम राबविण्यात येत होती. यादरम्यान मूल शहरातील गांधी चौक परिसरात ‘दरार दुर्गा मंडळ’च्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी असलेल्या डीजे वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. पोलीस पथकाने ध्वनीमापक यंत्राद्वारे (Sound Level Meter) केलेल्या मोजणीमध्ये संबंधित डीजे वाहनांवरील साऊंड सिस्टीमचा आवाज विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी संबंधित डीजे चालक व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ध्वनीची तीव्रता त्वरित कमी करण्याबाबत स्पष्ट व कायदेशीर सूचना दिल्या होत्या. मात्र, संबंधितांनी पोलिसांच्या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करून कर्णकर्कश आवाज सुरूच ठेवल्याने पोलिसांनी तात्काळ कायदेशीर बडगा उगारला.
पाच जणांवर गुन्हा, कलमे कोणती?
या प्रकरणी पोलिसांनी दरार दुर्गा मंडळाचे अध्यक्ष संतोष प्रभाकर ठाकूरवार (वय ५१, रा. मूल), डीजे मालक तथा चालक अनिकेत रवी ननावरे (वय २२), अभिषेक चंद्रशेखर चिट्टलोजवार (वय २२, रा. मूल), डीजे धुमाळ मालक तथा चालक धीरज जुगलकिशोर घिचरे (वय ५१, रा. मानेवाडा, नागपूर) आणि डीजे मालक तथा चालक लकी अनिल दुर्गे (वय १९, रा. बोरचांदली, ता. मूल) यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली आहे.
विहित मर्यादा ओलांडून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी आणि पोलिसांच्या कायदेशीर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर मूल पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ७३२/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ चे कलम २२३ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३८, १३६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील डीजे साहित्यासह एकूण ५ वाहने असा तब्बल ८५ लाख २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गणेश व दुर्गा उत्सव काळात ध्वनीप्रदूषण करणाऱ्यांवर पोलिसांकडून सुरू असलेल्या या कठोर भूमिकेमुळे नियमबाह्य डीजे वाजवणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






