मूल पोलिसांनी जप्त केलेली डीजे साऊंड सिस्टिम व वाहने (Mul Police DJ Action)

आवाज वाढव डीजे तुला…. चंद्रपुरात डीजे फुल व्हॉल्युम… पोलिसांनी केले २ डीजे जप्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

मूल (जि. चंद्रपूर): Mul Police DJ Action अंतर्गत गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान नियमबाह्य व कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यांविरोधात मूल पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आलेवाही आणि नवेगाव परिसरात करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करून ध्वनीतीव्रता नियमांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत साऊंड सिस्टिम, जनरेटर व दोन वाहनांसह सुमारे २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (हे हि वाचा – जुगार क्लबवर छापेमारी)

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश विसर्जन बंदोबस्तादरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके आणि पोलीस पथक आलेवाही व नवेगाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना, परवानगीविना व मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने पंचांसमक्ष घटनास्थळी जाऊन ध्वनीमापक यंत्राद्वारे पाहणी केली असता ध्वनीतीव्रता नियमांपेक्षा जास्त असल्याचे निष्पन्न झाले.

पहिली कारवाई (जय वाल्मीकी गणेश मंडळ, आलेवाही):

आलेवाही येथे टाटा एलपीटी वाहनावर (क्रमांक MH-36 AA-4191) साऊंड सिस्टिम लावून ७७.०३ डेसिबल या मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात होता. चौकशीदरम्यान डीजे मालक व ऑपरेटर रोहित युवराज येलमुळे (वय २५, रा. सिंदपुरी, ता. पवनी, जि. भंडारा) याने सदर डीजे जय वाल्मीकी गणेश मंडळाच्या मिरवणुकीसाठी आयोजकांच्या सांगण्यावरून वाजवत असल्याचे आणि त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत वाहन चालक भास्कर प्रल्हाद ढोरे (वय २५, रा. ईटान, जि. भंडारा), आयोजक सुरज राजू मारबते (वय २८, रा. आलेवाही) व रोहित येलमुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून १५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरी कारवाई (उज्वल ज्योत गणेश मंडळ, नवेगाव आलेवाही):

नवेगाव आलेवाही येथे टाटा ७०९ पिकअप वाहनावर (क्रमांक MH-01 BR-2461) डीजे साऊंड सिस्टिमद्वारे ७३.५० डेसिबल आवाजात ध्वनीक्षेपण सुरू होते. यात डीजे मालक गंगाधर सुखदेव बोरकर (वय ४२, रा. टेकरी, ता. सिंदेवाही), वाहन चालक रोशन गजानन टिकले (वय २१, रा. सायमारा, ता. सावली) आणि आयोजक वैभव धर्मराव तलांडे (वय २२, रा. नवेगाव आलेवाही) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या कारवाईत १० लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या दोन्ही कारवायांमध्ये डीजे ऑडिओ मशीन, स्पीकर बॉक्स, टॅप, मिक्सर, जनरेटर, पॉवर सेवर आणि दोन वाहने असा एकूण २६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३८ आणि १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, पोलीस अंमलदार उत्तम कुमरे, नरेश कोडापे, नरेंद्र वाकडे, दिलीप आदे, शंकर बोरसरे, प्रकाश चिकराम, गणेश आदे आणि अरविंद मेश्राम यांनी पार पाडली. आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ध्वनीमर्यादेचे पालन करण्याचे आवाहन मूल पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment