खासदार प्रतिभा धानोरकर यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत भेट (Rajura Police Inspector Allegations)

विधवा आईच्या डोळ्यात पाणी, सहायक पोलीस निरीक्षकाची अरेरावी; धानोरकर आक्रमक

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 22, 2026

चंद्रपूर: Rajura Police Inspector Allegations प्रकरणात राजुरा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्यावर नागरिक व लोकप्रतिनिधींना अश्लील शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कौटुंबिक वादाच्या चौकशीसाठी आलेल्या नगरसेवकांशी अरेरावी केल्याचे तसेच एका अल्पवयीन मुलीच्या मिसिंग तक्रारीसाठी आलेल्या तिच्या विधवा आईचा अपमान केल्याचेही सांगण्यात येते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन खातेनिहाय चौकशीची व कडक कारवाईची मागणी केली आहे. (हे हि वाचा – चंद्रपूर-नागपूर मार्गावर अवैध पार्किंग, वाचा हि बातमी)

    १९ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला मोकडे यांच्या मुलाच्या कौटुंबिक वादाच्या प्रकरणात विचारपूस करण्यासाठी गेलेले राजुरा शहर अध्यक्ष हरजीत सिंह संधू यांच्याशी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी अरेरावी व अपमानास्पद भाषा वापरली. त्यानंतर कुणाल मोकडे याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. एवढेच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांबद्दल अत्यंत अश्लील व गलिच्छ भाषा वापरून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा अनादर केला.

याव्यतिरिक्त, राजुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी हर्षाली सत्यपाल मोहूर्ले हिच्या मिसिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या तिच्या गरीब विधवा आईला कोणतीही मदत न करता, अत्यंत मानहानीकारक शब्द बोलून जबाबदारी झटकण्यात आली. एका असहाय्य विधवा महिलेला आणि सामान्य नागरिकांना न्याय देण्याऐवजी असा बेजबाबदार व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याचा घणाघात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पोलीस प्रशासनाकडून सामान्य जनता व लोकप्रतिनिधींना हीच वागणूक मिळत असेल, तर हे खपवून घेतले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यावर लोकप्रतिनिधित्व कायदा व शिस्तभंगाच्या नियमांनुसार तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. जर या प्रकरणात प्रशासनाने दिरंगाई केली, तर काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना शिष्टमंडळात जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा कुंदा जेनेकर, राजुरा तालुका अध्यक्ष रंजन लांडे, राजुरा बाजार समितीचे सभापती संतोष इंदुरवार, राजुरा शहर अध्यक्ष हरजीत सिंह संधू, कार्याध्यक्ष संघपाल देठे, नगरसेवक एजाज अहमद, राजुरा नगर परिषदेच्या सभापती पूनम गिरसावळे, नगरसेविका इंदुबाई निकोडे, अनुताई हरजीत सिंह संधू, मंगला मोकडे, कविता उपरे, तसेच सुमित्रा कुचनकर, सोनाली भगत, कुणाल मोकडे, रोहित बत्ताशंकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment