राजुरा / चंद्रपूर: Rajura Crime News राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डात एका तरुणाला धारदार सत्तूरसह पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. हातात शस्त्र घेऊन नागरिकांना धमकावणाऱ्या या आरोपीवर कारवाई करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. (हे हि वाचा – वरोऱ्यात पुन्हा पिस्तूल जप्त)
सोमेश्वर मंदिराजवळ सत्तूर उगारून नागरिकांना धमकावण्याचा प्रकार
राजुरा शहरातील सोमनाथपूर वॉर्डात हातामध्ये धारदार सत्तूर घेऊन नागरिकांना शिवीगाळ करत धमकावणाऱ्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला राजुरा पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून एक धारदार लोखंडी सत्तूर जप्त करून त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, १७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी राजुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील, पोलीस अंमलदार राजू दुबे आणि महेश बोडलावार हे शासकीय वाहनाने हद्दीत गस्त घालत होते. गस्तीदरम्यान दुपारी ३:१५ वाजताच्या सुमारास गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सोमनाथपूर येथील सोमेश्वर मंदिराजवळ, सुधाकर खंडाळे यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर एक इसम हातात धारदार सत्तूर घेऊन येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अश्लील शिवीगाळ करत असून आरडाओरड करून परिसरात दहशत माजवत आहे. माहितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाईची दिशा ठरवली आणि प्रवीण सुधाकर खंडाळे व मारोती तोलेजी वाघमारे या दोन पंचांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली.
१३ इंच लांबीचे धारदार लोखंडी सत्तूर जागेवरच जप्त
पोलीस पथक सोमेश्वर मंदिराजवळ पोहोचले असता, तिथे एक तरुण भररस्त्यात सत्तूर उगारून लोकांना धमकावत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष अत्यंत शिताफीने त्याला घेरून त्याच्या हातातील सत्तूर तात्काळ ताब्यात घेतला. पकडलेल्या संशयिताची विचारपूस केली असता त्याने आपले नाव सुरज चरणदास पिपरे (वय २५ वर्षे, रा. सोमनाथपूर वॉर्ड, राजुरा) असे सांगितले. पोलिसांनी जप्त केलेल्या हत्याराची पाहणी केली असता, ती १३ इंच लांबीची, ३.३ इंच पात्याची आणि ४.५ इंच मुठीची टोकदार व धारदार लोखंडी सत्तूर असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची अंदाजे किंमत १,००० रुपये आहे. सार्वजनिक ठिकाणी असे घातक शस्त्र विनापरवाना बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी पंचांसमक्ष रीतसर जप्ती पंचनामा करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश देवराम पाटील यांच्या लेखी फिर्यादीवरून आरोपी सुरज चरणदास पिपरे याच्याविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याच्या (आर्म्स ॲक्ट) कलम ४ व २५ अन्वये अपराध क्रमांक ०६८४/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप बाबुराव अडकिने करीत आहेत. भरवस्तीत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणावर पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






