बल्लारपूर (चंद्रपूर) : Ballarpur Police Crime News बल्लारपूर शहरात मध्यरात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला धारदार शस्त्रासह रंगेहात पकडले आहे. आरोपीकडून ४२ सेंटीमीटर लांबीची लोखंडी कुकरी जप्त करण्यात आली. श्रीराम वॉर्डातील स्मशानभूमी परिसरात हा आरोपी दबा धरून बसला होता. (हे हि वाचा – चिकनच्या भाजीवरून वाद, भावाने केली भावाची हत्या)
पोलिसांच्या ऑल आऊट मोहिमेदरम्यान ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ballarpur Police Crime News : सराईत गुन्हेगाराला शस्त्रासह रंगेहात अटक
शहरात रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र बाळगून दहशत माजविण्याच्या तयारीत असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला बल्लारपूर पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या आहेत. श्रीराम प्रभागातील स्मशानभूमीजवळ दबा धरून बसलेल्या या आरोपीकडून तब्बल ४२ सेंटीमीटर लांबीची धारदार लोखंडी कुकरी जप्त करण्यात आली. प्रभारी पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार शहरात राबविण्यात येत असलेल्या विशेष नाकाबंदी व ‘ऑल आऊट’ मोहिमेदरम्यान गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
शहरात दहशत माजविण्याच्या तयारीत असताना पोलिसांचा छापा
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष कोम्बिंग, नाकाबंदी आणि ऑल आऊट मोहीम राबविली जात होती. या मोहिमेअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे आपल्या पथकासह ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार, ढाबे आणि लॉजची तपासणी करत गस्त घालत होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, श्रीराम प्रभागातील स्मशानभूमी परिसरात एक रेकॉर्डवरील गुन्हेगार कमरेला प्राणघातक शस्त्र लावून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत आहे.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जोगदंड यांनी तात्काळ दोन पंचांना सोबत घेऊन श्रीराम वॉर्ड येथील स्मशानभूमीकडे धाव घेतली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता, बातमीदाराने वर्णन केल्याप्रमाणे एक तरुण अंधारात संशयास्पदरीत्या बसलेला आढळून आला. पोलिसांनी पंचांसमक्ष त्याला घेरून ताब्यात घेतले व त्याची विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याने आपल्या पॅन्टच्या पाठीमागील बाजूस खोचून ठेवलेली काळ्या रंगाची प्लास्टिकची मुठ असलेली वाकड्या पात्याची धारदार लोखंडी कुकरी लपवल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव दीपक उर्फ ए.टी.एम. अजय राजपूत (वय २२ वर्षे, रा. श्रीराम प्रभाग, बल्लारपूर) असे असून, तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. जप्त करण्यात आलेल्या घातक कुकरीची एकूण लांबी सुमारे ४२.०७ सेंटीमीटर असून तिचे पाते २८.०५ सेंटीमीटर लांब व ३.०५ सेंटीमीटर रुंद आहे. नागरिकांमध्ये भीती व दहशत निर्माण करण्यासाठीच हे शस्त्र बेकायदेशीररीत्या बाळगण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी पंचनामा करून ते शस्त्र जप्त केले.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड यांच्या तक्रारीवरून आरोपी दीपक उर्फ ए.टी.एम. याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा (आर्म्स ॲक्ट) कलम ४ आणि २५ अन्वये बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस हवालदार सत्यवान कोटनाके, पोलीस अंमलदार मिलिंद आत्राम, संदीप थेरे आणि शरदचंद्र कारुश यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मध्यरात्री झालेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील समाजकंटकांमध्ये खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






