राजुरा: राजुरा एटीएम फसवणूकीची घटना शहरात उघडकीस आली आहे. एटीएम केंद्रात मदतीचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने ६३ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याचे कार्ड हातचलाखीने बदलले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून ३७ हजार ८०० रुपये काढण्यात आले. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात घडली. याप्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. (वरोऱ्यात एमडी पावडर जप्त, वाचा हि बातमी)
राजुरा एटीएम फसवणूक: नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा येथील अंबादास वॉर्डात राहणारे ६३ वर्षीय श्रीहरी नारायण ठमके हे ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आसिफाबाद रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम मशीनमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अडचणीमुळे पैसे बाहेर आले नाहीत. त्यावेळी एटीएम केंद्रात आधीच दोन व्यक्ती उपस्थित होत्या. त्याच दरम्यान तिथे आलेल्या एका अनोळखी इसमाने “एटीएममध्ये कधीकधी तांत्रिक अडचण येते, तुम्ही कार्ड पुन्हा टाकून बघा,” असा सल्ला देत ठमके यांना पुन्हा पिन क्रमांक टाकण्यास सांगितले. मात्र तरीही पैसे न निघाल्याने ठमके आपले एटीएम कार्ड घेऊन घरी निघून गेले.
खात्यातून चार व्यवहारांत ३७,८०० रुपये कपात
घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच ठमके यांच्या मोबाईलवर बँकेकडून पैसे कपात झाल्याचे मेसेज येऊ लागले. यामध्ये १० हजार रुपयांचे तीन वेळा आणि ७ हजार ८०० रुपयांचा एक अशा एकूण चार व्यवहारांतून त्यांच्या खात्यातून ३७ हजार ८०० रुपये काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मेसेज पाहून धक्का बसलेल्या ठमके यांनी तात्काळ बँकेत धाव घेऊन विचारणा केली असता, बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातातील कार्ड तपासून ते दुसऱ्याच कोणाचे तरी एटीएम कार्ड असल्याचे सांगितले.
भामट्याने मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने ठमके यांचे मूळ एटीएम कार्ड बदलून दुसरेच कार्ड त्यांच्या हातात टेकवले आणि पिन क्रमांकाचा वापर करून त्यांच्या खात्यातील सर्व रक्कम काढून घेतली असल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठमके यांनी राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१८(४) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार विकी राजकुमार निर्वाण करत आहेत. या घटनेमुळे एटीएम केंद्रांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला असून नागरिकांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






