वरोरा: वरोरा एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत ६५ हजार रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले आहे. मोहबाळा ते जीएमआर कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी एमडी ड्रग्जसह बोलेरो पिकअप वाहन जप्त करून चालकाला अटक केली. आरोपीची ओळख दीपक मधुकर खारकर अशी झाली आहे. त्याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ड्रग्ज कुठे विक्रीसाठी नेले जात होते, याचा शोध पोलीस घेत आहेत. (विजेच्या क्षुल्लक वादात कुऱ्हाडीने हल्ला, वाचा हि बातमी)
वरोरा एमडी ड्रग्ज प्रकरणात पोलिसांची कारवाई
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, वरोरा पोलीस ठाण्यातील ‘डायल ११२’ च्या मदत कक्षात मोहबाळा परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या वाहनात अमली पदार्थ असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे वरोरा पोलिसांच्या पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. मोहबाळा गावाबाहेर जीएमआर कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका गोठ्याजवळ संशयित पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप वाहन (क्र. एम.एच. २७ बी.एक्स. ५७०३) उभे असल्याचे पोलिसांना दिसून आले.
वरोरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, शासकीय पंच, फोटोग्राफर आणि वजन-काटेवाल्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वाहनाला वेढा घातला. वाहनाजवळ उपस्थित असलेल्या चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने आपले नाव दीपक मधुकर खारकर (वय ४५, रा. टाकळी, ता. वरोरा) असे सांगितले.
एनडीपीएस कायद्यातील कलम ५०(१) मधील तरतुदीनुसार आरोपीला त्याच्या अधिकारांची कायदेशीर माहिती देऊन पंचांसमक्ष त्याच्या वाहनाची सखोल झडती घेण्यात आली. यावेळी बोलेरो पिकअपच्या कॅबिनवरील कॅरियरमध्ये ठेवलेल्या स्टेपनी टायरच्या वर एका काळ्या रंगाच्या प्लास्टिक पन्नीमध्ये झिप पाऊच लपवून ठेवल्याचे आढळले. सदर पाऊचची पाहणी केली असता त्यात पांढऱ्या-भुरकट रंगाची पावडर आढळून आली. उपस्थितांसमोर मापारी यांच्याद्वारे वजन केले असता ते ६ ग्रॅम ५२० मिग्रॅम वजनाचे ‘एमडी’ (मेफेड्रॉन) ड्रग्ज असल्याचे स्पष्ट झाले, ज्याची बाजारपेठेतील किंमत सुमारे ६५ हजार रुपये आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून ६५ हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज आणि गुन्ह्यात वापरलेले ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहन असा एकूण ५ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष सील बंद करून जप्त केला आहे. या सर्व कारवाईचे ई-साक्ष ॲपद्वारे व्हिडिओ शूटिंग व फोटो चित्रीकरण करण्यात आले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद श्यामजी भस्मे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दीपक मधुकर खारकर याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) च्या कलम ८(क) व २१(ब) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरोरा पोलीस करत असून, हे ड्रग्ज कुठे विकले जाणार होते आणि या तस्करीच्या मागे मोठे रॅकेट आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






