बल्लारपूर: ballarpur road accident news समोर आली असून शहरात भीषण अपघात घडला आहे. मद्यधुंद बोलेरो पिकअप चालकाने मेडिकल व्यावसायिकाला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात एका मेडिकल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाने पुढे जाऊन एका दुचाकीला आणि नंतर ट्रकलाही धडक दिली. (हे हि वाचा – चंद्रपूर हादरलं, मारहाणीच्या घटनेनंतर उघड झालं भयावह कांड)
बल्लारपुरात मेन रोडवर मद्यधुंद वाहनचालकाचे भीषण तांडव
बल्लारपूर शहरात एका मद्यधुंद बोलेरो पिकअप चालकाने रस्त्यावर अक्षरशः तांडव घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून मेडिकल व्यावसायिकाला पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामध्ये व्यावसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एवढ्यावरच न थांबता या बेदरकार चालकाने पुढे एका दुचाकीस्वाराला धडक देऊन जखमी केले आणि शेवटी दहेली गावाजवळ जाऊन एका ट्रकला धडक दिली. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी अज्ञात बोलेरो पिकअप चालकाविरुद्ध विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मेडिकल व्यावसायिक अरशद खान यांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, बल्लारपूर येथील टीचर कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले अरशद मुबारक खान (वय ४८) यांचे ‘बल्लारपूर मेडिकल’ नावाचे तीन मेडिकल स्टोअर्स आहेत. बुधवार, १९ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते ९:३० वाजेच्या सुमारास ते आपली ओला इलेक्ट्रिक मोपेड (क्रमांक MH 34 CG 7786) घेऊन बल्लारपूरहून बामणी येथील मेडिकल दुकानाकडे जात होते. दरम्यान, मेन रोडवरील व्यंकटेश अपार्टमेंटसमोर मागून भरधाव व बेदरकारपणे आलेल्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप गाडीने (क्रमांक MH 32 Q 2595) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून अत्यंत जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अरशद खान दूर फेकले गेले, त्यांच्या डोक्यातील हेल्मेट उडून गेले आणि ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर प्रत्यक्षदर्शींनी तातडीने त्यांना उपचारासाठी वाघमारे हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखलपूर्व मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच त्यांचा मुलगा मौहसीन खान व कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.
दरम्यान, अरशद खान यांना धडक दिल्यानंतर सदर मद्यधुंद बोलेरो पिकअप चालकाने गाडी न थांबवता पुढे आणखी एका दुचाकीला धडक देऊन चालकाला जखमी केले. त्यानंतर दहेली गावापर्यंत पळ काढत त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या घटनेत स्वतः पिकअप चालकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
मयत अरशद खान यांचे सुपुत्र मौहसीन अरशद खान (वय २२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात आरोपी बोलेरो पिकअप (MH 32 Q 2595) चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम १०५, १२५(a), १२५(b), २८१ सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १८५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल दुधाराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






