Chandrapur Gas Cylinder Scam kosara police supply department raid

चंद्रपुरात गॅस चोरी, घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 20, 2026

चंद्रपूर – Chandrapur Gas Cylinder Scam प्रकरणात चंद्रपूर लगतच्या कोसारा परिसरात पुरवठा विभाग आणि पोलिसांनी मोठी संयुक्त कारवाई केली आहे. या धाडीत घरगुती सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये बेकायदेशीर गॅस भरण्याचे रॅकेट उघडकीस आले असून तब्बल ४३ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅस काढून त्याचे रिफिलिंग करून काळाबाजार करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा चंद्रपूरजवळील कोसारा परिसरात पर्दाफाश करण्यात आला आहे. पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या कारवाईत विविध कंपन्यांचे तब्बल ४३ गॅस सिलिंडर, रोख रक्कम, आक्षेपार्ह कागदपत्रे, रिफिलिंगचे साहित्य आणि एक वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पिंटू कुमार नामक व्यक्तीविरुद्ध रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुरवठा व पोलिस विभागाने पुढील सखोल तपास सुरू केला आहे. (हे हि वाचा – मारहाणीच्या घटनेमुळं उघड झालं भयावह कांड)

कोसारा येथील गोदामावर पुरवठा विभाग व पोलिसांची संयुक्त धाड

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वसामान्य नागरिकांना घरगुती सिलिंडरमध्ये निर्धारित वजनापेक्षा कमी प्रमाणात गॅस मिळत असल्याच्या आणि सिलिंडर अपेक्षेपेक्षा लवकर संपत असल्याच्या तक्रारी आम आदमी पक्षाकडे सातत्याने येत होत्या. सर्वसामान्यांची होणारी ही फसवणूक गांभीर्याने घेत ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा माग काढला. चौकशीदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज गुरुवारी दुपारी १२:३५ वाजण्याच्या सुमारास कोसारा परिसरातील एका हवेलीजवळील घरावर (गोदामावर) ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली व तातडीने पुरवठा विभाग, महसूल व पोलिस प्रशासनाला घटनास्थळी पाचारण केले.

४३ गॅस सिलिंडरसह रिफिलिंग साहित्य व वाहन जप्त

पुरवठा निरीक्षण अधिकारी सविता गंभीरे आणि पुरवठा निरीक्षक मंजूषा काकडे यांच्यासह पोलिस पथकाने केलेल्या तपासणीत हे गोदाम सप्रेम गॅस एजन्सीशी संबंधित असल्याचे आणि येथे राजस्थान येथील मजुरांच्या माध्यमातून घरगुती सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरण्याचा बेकायदेशीर धंदा सुरू असल्याचे उघडकीस आले. तपासणीदरम्यान पहिल्या खोलीत भारत गॅस व एचपी कंपनीचे घरगुती तसेच व्यावसायिक असे ८ सिलिंडर, तर दुसऱ्या खोलीत ६ सिलिंडर आढळून आले. या सिलिंडरचे वजन केले असता ते निर्धारित मानकांपेक्षा दोन किलोपर्यंत कमी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गोदामासमोर उभ्या असलेल्या MH-34-AB-9094 या क्रमांकाच्या वाहनातूनही सिलिंडर जप्त करण्यात आले. घटनास्थळावरून एकूण ४३ सिलिंडर, रिफिलिंगची साधने व रोकड जप्त करून पोलिसांनी रीतसर पंचनामा केला.

धाडीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीने चौकशीत धक्कादायक माहिती दिली असून, शहरातील इतरही अनेक गॅस एजन्सींमध्ये अशाच प्रकारे कमी वजनाचे सिलिंडर तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे सांगितले. त्यामुळे हे केवळ एका गोदामापुरते मर्यादित नसून शहरात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या कारवाईप्रसंगी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील मुसळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, चंद्रपूर युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, चंद्रपूर महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, जिल्हा पदाधिकारी विशाल बिरमवार यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. ही केवळ आर्थिक फसवणूक नसून अनधिकृत रिफिलिंगमुळे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याने या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि प्रशासनाने शहरातील सर्व गॅस एजन्सींची नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी ठाम मागणी ‘आप’तर्फे करण्यात आली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment