चंद्रपूर: Ramnagar Chandrapur Crime News चंद्रपूर शहरात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. स्वतःच्या मुलीवर पाच वर्षे अत्याचार करणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित तरुणीच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. एका मारहाणीच्या प्रकरणाच्या चौकशीतून या भीषण अत्याचाराची पोलखोल झाली आहे. (हे हि वाचा – प्रेमसंबंधाच्या संशयावरून सिनेस्टाइल पाठलाग करीत एकाला मारहाण)
पाच वर्षांपासून सुरू होता तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ
एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन असतानापासून ते आता १९ वर्षे वय झालेल्या मुलीवर तब्बल पाच वर्षांपासून सातत्याने लैंगिक व मानसिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या भीषण छळाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने धाडस दाखवत रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विकृत मनोवृत्तीच्या आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.
विरोध केल्यास आईसह घराबाहेर काढण्याची आणि जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, कामाच्या निमित्ताने शहराबाहेर राहणारा हा आरोपी दर चार-पाच महिन्यांनी घरी सुट्टीवर आला की मुलीसोबत अश्लील चाळे करणे, अंगाला गैरस्पर्श करणे, तिला अश्लील व्हिडिओ पाहण्यास भाग पाडणे आणि मारहाण करणे असे घृणास्पद प्रकार करत असे. पीडित मुलीने या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला आणि तिच्या आईला घरातून हाकलून देण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी आरोपी वारंवार देत होता. कुटुंबाची अब्रू व नराधमाच्या दहशतीमुळे पीडिता हा भयानक त्रास वर्षानुवर्षे मुकाट्याने सहन करत होती.
दरम्यान, जुलै महिन्यात हा आरोपी घरी आला असता त्याच्या अत्याचाराची परिसीमा गाठली गेली. २४ जुलै रोजी पीडितेच्या वाढदिवसाच्याच दिवशी रात्री ती झोपेत असताना आरोपीने तिच्यासोबत लज्जास्पद चाळे केले आणि तिने विरोध करताच तिला बेदम मारहाण केली. यापूर्वी १७ जुलैच्या रात्रीही आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता व आरडाओरड केल्यास आईला कायमचे सोडून देण्याची धमकी दिली होती.
हे गंभीर प्रकरण एका अनपेक्षित घटनेतून उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली होती. त्या मारहाणीच्या तपासात पोलिसांनी पाच तरुणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, संबंधित व्यक्ती आपल्या मैत्रिणीवर (पीडित तरुणीवर) तिच्याच घरात असा घृणास्पद अत्याचार करत असल्याने आपण त्याला मारहाण केल्याचे त्या तरुणांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने आपल्यावर ओढवलेला सर्व भयानक प्रसंग कथन केला.
पीडितेच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ६४(२), ६५(१), ६३(डी) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पॉक्सो ॲक्ट) गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक केली आहे. सदरची कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी वाकडे यांनी केली असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






