Nagbhid Tiger Attack News body found in Chindimal lake Bramhapuri forest division

मासेमारीला गेले अन् परतलेच नाहीत; ४ दिवसांनंतर तलावात आढळले मृतदेहाचे छिन्नविछिन्न अवशेष!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 19, 2026

नागभीड / चंद्रपूर: Nagbhid Tiger Attack News नागभीड वनपरिक्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या ५४ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे अवशेष चिंदीमाल तलावात सापडले आहेत.

स्थानिक नागरिकांनी माहिती दिल्यानंतर वनविभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील २८ वा बळी ठरल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. (हे हि वाचा – वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार)

चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील ठरला २८ वा बळी

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून मासेमारीसाठी गेलेल्या एका ५४ वर्षीय व्यक्तीचा वाघाच्या संभाव्य हल्ल्यात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या व्यक्तीचे छिन्नविछिन्न शरीराचे अवशेष जंगलालगत असलेल्या चिंदीमाल तलावात तरंगताना आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील हा २८ वा बळी आहे.

मिळालेल्या अधिकृत प्राथमिक माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील तुकूम येथील रहिवासी मोरेश्वर गोपीचंद सावसाकडे (वय ५४ वर्षे) हे दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी घरातून मासेमारी करण्यासाठी बाहेर पडले होते. मात्र, ते रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू केली होती. सलग चार दिवस त्यांचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. दरम्यान, १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास जंगलाने वेढलेल्या चिंदीमाल परिसरातील सर्वे क्रमांक २३ मधील तलावात (चिंदीमाल तलाव) काही नागरिकांना मृतदेहाचे अवशेष दिसून आले. ही माहिती तत्काळ वनविभाग व स्थानिक पोलिसांना देण्यात आली.

माहिती मिळताच नागभीड वनपरिक्षेत्र व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, हे अवशेष बेपत्ता असलेले मोरेश्वर सावसाकडे यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळावरील परिस्थिती आणि जंगलालगतचा परिसर पाहता हा हल्ला वाघाने केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृतदेह पाण्यात कुजलेल्या व अवशेषांच्या स्थितीत आढळल्यामुळे मृत्यू नेमका वाघाच्या हल्ल्यामुळेच झाला की अन्य कारणाने, याची अधिकृत पुष्टी शवविच्छेदनानंतरच होणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. पोलिसांनी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

नागभीड व ब्रह्मपुरी वनविभागातील या घटनेमुळे स्थानिक नागरिक, शेतकरी व मच्छीमारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग आणि पोलीस प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू असून जंगलालगतच्या तलावांवर किंवा संवेदनशील भागात नागरिकांनी एकटे जाणे टाळावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment