Chandrapur Municipal Action against illegal hotel and road encroachments

चंद्रपुरात अतिक्रमणांवर मनपाचा थेट हातोडा; हॉटेल केले जागेवरच सील!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 19, 2026

चंद्रपूर: Chandrapur Municipal Action चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरात अनधिकृत व्यावसायिक वापर व अतिक्रमणांविरोधात मोठी मोहीम राबवण्यात आली. मनपाच्या पथकाने विविध भागांत धडक कारवाई केली.

या कारवाईत मँगो ट्री रेसिडेन्शियल भागातील हॉटेल सील करण्यात आले. तसेच हस्तांतरित खुल्या जागा आणि हवेली गार्डन मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.

मँगो ट्री रेसिडेन्शियल एरियामधील अनधिकृत कमर्शिअल हॉटेल सील

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत व्यावसायिक वापर तसेच सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात जोरदार धडक मोहीम राबविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासकांच्या निर्देशानुसार अतिक्रमण नियंत्रण व अनधिकृत बांधकाम विरोधी पथकाने शहरातील विविध भागांत एकाच वेळी कारवायांचा बडगा उगारत निवासी भागात सुरू असलेले हॉटेल सील केले, तसेच महानगरपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा व मुख्य रस्ते अतिक्रमणमुक्त केले.

पहिल्या कारवाईत जिल्हा स्टेडियम परिसरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या ‘मँगो ट्री रेसिडेन्शियल एरिया’मध्ये महापालिकेने कारवाई केली. या निवासी क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून रहिवासी जागेचा वापर अनधिकृतपणे व्यावसायिक हॉटेल चालवण्यासाठी केला जात असल्याचे तपासणीदरम्यान प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या बेकायदेशीर व्यावसायिक वापरावर थेट कारवाई करत महापालिकेच्या पथकाने संबंधित हॉटेल जागेवरच सील केले. (हे हि वाचा – चंद्रपूर शहरातील रस्त्यावर खड्डे दिसले कि करा तक्रार)

दुसऱ्या कारवाईत महानगरपालिकेकडे कायदेशीररीत्या हस्तांतरित करण्यात आलेल्या ओपन स्पेसवरील (मोकळी जागा) अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या या भूखंडावर काही व्यक्तींनी अनधिकृत कब्जा केला होता. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने घटनास्थळी पोहोचून हे अतिक्रमण पूर्णपणे जमीनदोस्त करत जागा पूर्ववत मोकळी केली.

तिसऱ्या कारवाईत शहरातील वर्दळीच्या हवेली गार्डन परिसरातील मुख्य रस्त्यावर थाटण्यात आलेल्या अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला. या मार्गावर रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे दुकाने व शेड्स उभारल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होऊन अपघातांची शक्यता वाढली होती. महापालिकेच्या पथकाने रस्त्यावरील सर्व तात्पुरती व कायमस्वरूपी अतिक्रमणे हटवून रस्ता रहदारी व वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला.

शहरातील सार्वजनिक जागा, रस्ते, पदपथ आणि मनपाच्या मालकीच्या भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या, निवासी भागात अनधिकृत व्यावसायिक वापर करणाऱ्या आणि सार्वजनिक जागा हडपणाऱ्यांवर यापुढेही नियमानुसार अशीच कठोर कारवाई सातत्याने सुरू राहील, असा स्पष्ट इशारा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment