चंद्रपूर: Chandrapur Police Action अंतर्गत चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑगस्ट महिन्यात व्यापक कारवाई केली आहे. या मोहिमेत पोलिसांनी दारू, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ आणि अवैध शस्त्रांवर धाडी टाकल्या. या धडक कारवाईत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने माहे ऑगस्ट २०२६ मध्ये व्यापक आणि आक्रमक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एकाच महिन्यात अवैध दारू, जुगार, गोवंश तस्करी, अमली पदार्थ, रेती चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर धडक कारवायांचा बडगा उगारण्यात आला असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे. (हे हि वाचा – राजुरा शहरातील पापा जाधव हत्याकांडातील आरोपींवर मकोका)
Chandrapur Police Action अंतर्गत शेकडो गुन्हेगारांवर एकाच महिन्यात कडक कारवाई
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध चालवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी एकूण ३७८ गुन्हे दाखल करून तब्बल ४५९ आरोपींना गजाआड केले आहे, तर या कारवायांमध्ये ८० लाख ६८ हजार ६०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूबंदी कायद्यांतर्गत सर्वाधिक कारवाया करत ३५५ गुन्हे उघडकीस आणले गेले आणि ५० लाख ३१ हजार १३० रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला, तर गावठी हातभट्टी दारूच्या ५ प्रकरणांत २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. जुगार अड्ड्यांवर धाडी टाकून ८८ प्रकरणांमध्ये तब्बल १ कोटी ५ लाख ११ हजार ६११ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गोवंश तस्करी आणि अवैध रेती उपशावर पोलिसांचा मोठा अंकुश
जिल्ह्यातील पर्यावरणाला आणि पशुधनाला हानी पोहोचवणाऱ्या समाजकंटकांवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली. अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्यांविरोधात १८ कारवाया राबवून तब्बल १७९ गोवंशाची सुटका करण्यात आली असून यात ३१ वाहनांसह १ कोटी ९६ लाख २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे पर्यावरणाची हानी करणाऱ्या अवैध रेती तस्करांवर ८ प्रकरणांत कारवाई करत १ कोटी ५७ लाख ८१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेत (एनडीपीएस) पोलिसांनी ५७ कारवाया करत एकूण १० लाख ४२ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त केले, ज्यामध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा २० किलो ९९ ग्रॅम गांजा आणि ४२ हजार ६५० रुपये किमतीचे ४ ग्रॅम ६५० मिलिग्रॅम एम.डी. ड्रग्जचा समावेश आहे. याशिवाय आरोग्यास घातक असणाऱ्या प्रतिबंधित सुगंधी तंबाखूच्या ११ गुन्ह्यांमध्ये १९ लाख ८६ हजार ५१३ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तसेच कोटपा कायद्यांतर्गत ६९७ प्रकरणांतून १ लाख ३९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
घातक बेकायदेशीर शस्त्रांसह सराईत गुन्हेगारांवर मकोका आणि तडीपारी
गुन्हेगारांमधील शस्त्रांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी हत्यार कायद्यान्वये ९ कारवाया केल्या. यामध्ये २ भरमार बंदुका, ५ पिस्तूल, २६ जिवंत काडतुसे, १ तलवार, १ चाकू आणि १ सत्तूर अशी एकूण ७ लाख ९८ हजार १०० रुपयांची घातक बेकायदेशीर शस्त्रे जप्त करण्यात आली. सराईत गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ३ सराईत टोळ्यांवर मकोका (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली असून ६ कुख्यात गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
कडक वाहतूक नियमावलीमुळे चंद्रपुरात अपघातांत मोठी घट
नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरही कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या २२ हजार १०२ चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करत १ कोटी ९० लाख ८९ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावला. यामध्ये विनाहेल्मेट ५,५३३, ट्रिपल सीट २,००६, सीटबेल्ट न वापरणे १,१०८, वाहन चालवताना मोबाईलचा वापर ५८६, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे २८८ आणि अल्पवयीन मुलांनी वाहन चालवल्याप्रकरणी १४ कारवायांचा समावेश आहे. पोलिसांच्या या प्रभावी वाहतूक नियंत्रण मोहिमेमुळे प्राणघातक अपघातांत ११ ने घट झाली असून अपघाती मृत्यूचे प्रमाण २२ ने म्हणजेच तब्बल ९.१२ टक्क्यांनी कमी झाले आहे.
केवळ गुन्हेगारांवर कारवाई न करता चोरीच्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यातही पोलिसांना मोठे यश आले आहे. चेन स्नॅचिंगचे ४ गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५३ हजार रुपयांचा ऐवज, घरफोडीचे १२ गुन्हे उघड करून ४ लाख ८४ हजार ५२५ रुपयांचा मुद्देमाल आणि चोरीच्या ३७ गुन्ह्यांची उकल करत एकूण ७४ लाख २९ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या मोहिमेत चोरीला गेलेल्या ३ लाख ७० हजार रुपयांच्या १० मोटारसायकली शोधून मूळ मालकांना दिलासा देण्यात आला. यासोबतच पोलिसांनी मानवी दृष्टिकोन बाळगत राबवलेल्या शोधमोहिमेत १६ मुली, ५ मुले, ४८ महिला आणि २६ पुरुष अशा एकूण ९५ बेपत्ता व अपहृत व्यक्तींचा यशस्वीरीत्या शोध लावून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
पोलीस ठाण्यांमधील तपास अधिकारी आणि पैरवी अधिकाऱ्यांच्या भक्कम पुराव्यांच्या जोरावर ब्रम्हपुरी, नागभीड आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना ऑगस्ट महिन्यात न्यायालयाने कठोर शिक्षा ठोठावली असून पोलिसांच्या उत्कृष्ट पैरवीचे कौतुक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता, शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अवैध धंद्यांविरोधातील ही धडक मोहीम यापुढेही अधिक तीव्र गतीने सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






