Chandrapur Police CCTV Van and new patrol vehicles launched by Guardian Minister Ashok Uike

चंद्रपुरात गुन्हेगारांवर ३६० अंशातून नजर; नवी वाहने सेवेत

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 19, 2026

चंद्रपूर: Chandrapur Police CCTV Van आणि १४ नवीन गस्ती वाहने चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या सेवेत दाखल झाली आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खरेदी केलेल्या या वाहनांचा भव्य लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयात पार पडला. पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते आणि प्रमुख लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही सर्व वाहने जनतेच्या सुरक्षेसाठी समर्पित करण्यात आली.

या अत्याधुनिक वाहनांमुळे ‘सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला गती मिळणार असून शहरातील संवेदनशील भागांवर आता ३६० अंश फिरणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे २४ तास निगराणी ठेवणे शक्य होणार आहे. (हे हि वाचा – उद्योगावर खंडणीसाठी दबाव टाकणार तर थेट तुरुंगात जाणारा)

डीपीसी निधीतून १४ गस्ती वाहने; दुर्गम भागातील पोलीस गस्त होणार वेगवान

जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्थेची आव्हाने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील चोख निगराणी या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात १४ नवीन वाहने आणि दोन अत्याधुनिक ‘मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन’ दाखल झाल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) विशेष निधीतून खरेदी करण्यात आलेल्या या सर्व वाहनांचा भव्य लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या शुभहस्ते आणि प्रमुख लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सर्व आधुनिक वाहने जनतेच्या सुरक्षेसाठी आणि पोलीस सेवेसाठी समर्पित करण्यात आली. या उपक्रमामुळे ‘सक्षम पोलीस दल, सुरक्षित चंद्रपूर’ या उद्दिष्टाला नवी गती मिळणार असून पोलीस प्रशासनाची गतिशीलता आणि गस्तीचे जाळे अधिक भक्कम होणार आहे.

पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित या विशेष लोकार्पण सोहळ्याला चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, राजुऱ्याचे आमदार देवराव भोंगळे तसेच वरोऱ्याचे आमदार करण देवतळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. याशिवाय प्रशासकीय पातळीवरून जिल्हाधिकारी वसुमना पंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह आणि महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांची विशेष उपस्थिती होती.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, प्रभारी पोलीस उपअधीक्षक अजिंक्य तांबडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, चंद्रपूर शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, रामनगरच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे, पोलीस मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, राखीव पोलीस निरीक्षक किसन नवघरे, बिनतारी संदेश विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खरतड यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, अंमलदार आणि जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्यासह प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Chandrapur Police CCTV Van ची अत्याधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान

या सोहळ्यात सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते ताफ्यात नव्याने सामील झालेल्या दोन अत्याधुनिक ‘मोबाईल सीसीटीव्ही सर्व्हिलन्स व्हॅन’ने. शहरातील संवेदनशील परिसर, राजकीय मोर्चे, आंदोलने, सण-उत्सवातील अलोट गर्दी तसेच कोणत्याही आपत्कालीन प्रसंगात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही फिरती यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरणार आहे. या व्हॅनवर ३६० अंशात फिरणारे उच्च क्षमतेचे पीटीझेड (PTZ) आणि नाईट-व्हिजन हाय-डेफिनिशन कॅमेरे बसविण्यात आले असून, ते दूरवरच्या परिसराचे स्पष्ट व अचूक चित्रण करण्यास सक्षम आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे कॅमेरे थेट पोलीस मुख्यालयातील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी (कमांड अँड कंट्रोल सेंटर) जोडण्यात आले असल्याने वरिष्ठ अधिकारी मुख्यालयात बसूनही प्रत्यक्ष घटनास्थळावरील घडामोडींवर एकाच वेळी बारकाईने नजर ठेवू शकणार आहेत.

थेट मुख्यालयातील कंट्रोल रूमशी जोडणी: जागेवरूनच बारीक नजर

या मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅनच्या अंतर्गत रचनेमध्ये अत्याधुनिक मॉनिटर्स, भव्य व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टोरेज आणि गर्दी पांगवण्यासाठी अथवा जनतेला सूचना देण्यासाठी अद्ययावत पब्लिक ॲड्रेस सिस्टीम (ध्वनिक्षेपक यंत्रणा) बसविण्यात आली आहे, ज्यामुळे ही गाडी म्हणजे एक प्रकारची फिरती तात्पुरती नियंत्रण कक्ष म्हणूनच कार्यरत राहील. अचानक उद्भवणाऱ्या अनुचित घटनांमध्ये तातडीने निर्णय घेण्यासाठी आणि जलद प्रतिसादासाठी ही वाहने मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीकडून मिळालेल्या इतर नवीन गस्ती वाहनांमुळे जिल्ह्यातील दुर्गम तसेच शहरी भागातील नियमित पोलीस गस्त अधिक वेगवान होणार असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण होण्यास मोठी मदत होणार आहे. सदर कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन चंद्रपूर पोलीस दलाच्या मोटार परिवहन विभाग, पोलीस कल्याण विभाग, बिनतारी संदेश विभाग, सायबर पोलीस ठाणे आणि मुख्यालय कर्मचाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने पार पाडले.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment