चंद्रपूर पोलीस बंदोबस्तादरम्यान AI CCTV व्हॅनचा वापर

चंद्रपुरात उत्सव अन् निवडणूक; पोलिसांचा विशेष बंदोबस्त

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 28, 2026

चंद्रपूर: चंद्रपूर पोलीस बंदोबस्तादरम्यान जिल्हा पोलिसांनी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या काळात विविध सुरक्षा उपाय राबविल्याची माहिती दिली आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात एकूण ६,६३८ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. गर्दीच्या ठिकाणी निगराणीसाठी AI CCTV व्हॅनचा वापर करण्यात आला. तसेच विनापरवाना किंवा नियमबाह्य डीजे प्रकरणांत १५ गुन्हे दाखल करून साहित्य जप्त केल्याचा दावा आहे. या काळात धार्मिक कार्यक्रम, मिरवणुका आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठीही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. (गडचांदूरात १ किलो गांजा जप्त, वाचा बातमी)

जिल्ह्यात श्रावण मास, नागपंचमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दहीहंडी, बैलपोळा-तान्हापोळा, गणेशोत्सव, मसक्या गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन, ऐतिहासिक दसरा मेळावा, रावण दहन, श्री माता महाकाली महोत्सव तसेच नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक या सलग सण-उत्सव आणि महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या काळात चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने २४ तास सजग राहत कडेकोट बंदोबस्त तैनात केला. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी, विविध शाखांचे पोलीस निरीक्षक, अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या प्रभावी नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे अबाधित राखण्यात यश आले आहे.

चंद्रपूर पोलीस बंदोबस्तात AI CCTV व्हॅनचा वापर

विविध सण-उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने पूर्वतयारीवर विशेष भर देत गणेश मंडळांच्या ५०, शांतता समितीच्या ४५, मोहल्ला कमिटीच्या २१, पोलीस मित्रांच्या २४, नागरिक समन्वय समित्यांच्या २६ तसेच विविध शासकीय विभागांसोबत ३५ अशा एकूण २०० हून अधिक महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या होत्या. आपत्कालीन स्थितीचा मुकाबला करण्यासाठी संवेदनशील पोलीस ठाण्यांत दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम (मॉकड्रिल) घेण्यात आली, तर १३ पोलीस ठाण्यांमधील दंगल नियंत्रण साधनसामग्रीची काटेकोर तपासणी करण्यात आली.

पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

या वर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान कायदा, सुव्यवस्था आणि शांतता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने एक अत्यंत दूरगामी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. महाराष्ट्र राज्यात प्रथमच चंद्रपूर जिल्ह्यात ‘एक गणेश मंडळ, एक पोलीस अंमलदार’ (One Ganpati Mandal, One Amaldar) ही संकल्पना प्रत्यक्ष जमिनीवर यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

या उपक्रमामुळे जिल्ह्यात एकूण १५,७०० गणेशमूर्तींची (२,२१३ सार्वजनिक व १३,४८७ खाजगी) स्थापना झालेली असतानाही अनंत चतुर्दशीसह सर्व दिवसांचे विसर्जन अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडले. तसेच जिल्ह्यात स्थापित करण्यात आलेल्या ८५७ मसक्या गणपतींचे विसर्जनही अत्यंत शांततेत संपन्न झाले. याशिवाय शारदीय नवरात्रोत्सवात ३,७५५ हून अधिक दुर्गा व शारदा मूर्ती तसेच ४८ दांडिया रास आयोजनांवर सीसीटीव्ही, तात्पुरते वॉच टॉवर आणि महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष ‘दामिनी पथके’ व गस्त तैनात करण्यात आली होती.

श्री माता महाकाली महोत्सवाच्या पालखी प्रदक्षिणा व महाआरतीदरम्यान सुमारे ३० ते ४० हजार भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग व गर्दी नियंत्रण मार्गांचे प्रभावी नियोजन करण्यात आले होते. ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन व दीक्षाभूमीवरील पवित्र अस्थिकलश रॅलीत ८ ते १० हजार नागरिक, तर मुख्य सोहळ्यासाठी सुमारे २.५ ते ३ लाख अनुयायी उपस्थित होते. या प्रचंड गर्दीच्या सुरक्षेसाठी २ उपविभागीय पोलीस अधिकारी, १५ पोलीस निरीक्षक, ६६ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, ७६७ पोलीस अंमलदार व १०४ वाहतूक कर्मचारी तैनात करण्यात आले होते, ज्यावर ड्रोन देखरेख, अखंडित व्हिडिओग्राफी व दंगल नियंत्रण पथकांद्वारे कडक नजर ठेवण्यात आली.

या सर्व सण-उत्सव, भव्य मिरवणुका, महामेळावे आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने पारंपरिक बंदोबस्ताला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले. पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमतःच ‘AI CCTV सर्व्हेलन्स व्हॅन’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फिरती निगराणी व्हॅन) प्रत्यक्ष बंदोबस्तात तैनात करण्यात आली.

गर्दीच्या ठिकाणी, मिरवणूक मार्गावर आणि संवेदनशील भागांमध्ये समाजकंटक, सराईत गुन्हेगार व संशयितांवर २४ तास करडी नजर ठेवण्यासाठी या अत्याधुनिक व्हॅनचा प्रभावी वापर करण्यात आला, ज्यामुळे मानवी डोळ्यांना गर्दीत न दिसणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर तंत्रज्ञानाने अचूक मात केली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणारे १ गणेश मंडळ आणि ४ दुर्गा/शारदा देवी मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई देखील करण्यात आली आहे.

सण-उत्सवांच्या काळात ६,६३८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

कायदा व सुव्यवस्था अधिक कठोरपणे कायम राखण्यासाठी गणेशोत्सवात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) विविध कलमान्वये ३,८२६ व्यक्तींवर आणि नवरात्रोत्सवात २,८१२ व्यक्तींवर अशी एकूण ६,६३८ समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच गणेशोत्सवात १७६१ इसमांविरुद्ध ४ दिवसांकरिता तडीपारीची कारवाई करण्यात आली असून सराईत गुन्हेगारांवर तडीपारी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए (MPDA) अन्वये कडक प्रस्ताव दाखल करण्यात आले.

दुसरीकडे, माननीय न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून विनापरवाना व कर्णकर्कश डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध दुर्गापूर, राजुरा, रामनगर, मूल, सिंदेवाही आणि चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांत एकूण १५ गुन्हे दाखल करून सुमारे २ कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांचे डीजे साहित्य, जनरेटर, प्रेशर मिड्स व वाहने अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी चोख बंदोबस्त

याच कालावधीत पार पडलेल्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३२,२६२ मतदारांकरिता ३० इमारतीमधील ५८ मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली. केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक सुरक्षा सुनिश्चित करून १९ पोलीस ठाण्यांची गस्त पथके, २१ स्थिर सर्वेक्षण पथके (SST), १७ भरारी पथके (FST) आणि १३ व्हिडिओ सर्वेक्षण पथके (VST) २४ तास कार्यरत होती, तर सुरक्षेचा उपाय म्हणून ३३७ परवानाधारक शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली होती.

सलग सण-उत्सव व निवडणुकीच्या अत्यंत संवेदनशील काळात कर्तव्य बजावणाऱ्या सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक करत पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सजग नागरिक, शांतता समितीचे सदस्य, उत्सव मंडळे, पोलीस मित्र, विविध सामाजिक-स्वयंसेवी संघटना, शासकीय विभाग आणि माध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही नागरिकांनी असेच सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

1 thought on “चंद्रपुरात उत्सव अन् निवडणूक; पोलिसांचा विशेष बंदोबस्त”

Leave a Comment