चंद्रपूर वाघ हल्ला मृत्यू झालेल्या गिलबिली जंगलातील जुनोना वनपरिक्षेत्र परिसर

चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार, मानव वन्यजीव संघर्षातील ३६ वा बळी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 28, 2026

बल्लारपूर: चंद्रपूर वाघ हल्ला मृत्यू प्रकरणात बल्लारपूरजवळ ६५ वर्षीय मजुराचा बळी गेला. जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलात बुधवारी (२८ ऑक्टोबर) सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. मृत मजूर बांबू कटाईसाठी जंगलात गेले होते. मंगळवारी सायंकाळपासून ते बेपत्ता होते. वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलात वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मृत मजुराची ओळख कलमसिंह पंचमसिंह उइके (६५, रा. खापा, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) अशी पटली आहे. बांबू कटाईच्या कामासाठी जंगलात गेलेले कलमसिंह मंगळवारी सायंकाळपासून बेपत्ता होते, त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. मानव-वन्यजीव संघर्षातील या चालू वर्षातील हा ३६ वा बळी ठरल्याने परिसरात तीव्र शोक आणि संतापाची लाट पसरली आहे. (ब्रह्मपुरीत ४ वर्षाच्या मुलावर वाघाचा हल्ला, वाचा बातमी)

चंद्रपूर वाघ हल्ला मृत्यू: गिलबिली जंगलात काय घडले?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मृत कलमसिंह उइके हे जंगल ठेकेदार सुखविंदरसिंह भोये यांच्याकडे बांबू कटाईचे काम करण्यासाठी आले होते. गत २७ ऑक्टोबर रोजी ते इतर मजुरांसोबत जुनोना वनपरिक्षेत्रातील गिलबिली जंगलातील कक्ष क्रमांक ४६० मध्ये बांबूचे बंडल बांधण्याच्या कामासाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास इतर मजूर जंगलातून परतले, मात्र कलमसिंह परत आले नाहीत. बराच वेळ त्यांचा पत्ता न लागल्याने सहकाऱ्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली.

बुधवारी सकाळी जंगलात आढळला मृतदेह

बुधवारी सकाळी सहकाऱ्यांनी पुन्हा जंगलात शोधमोहीम राबवली असता, सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह जंगलात आढळला. प्राथमिक तपासात वाघाच्या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एफडीसीएमच्या (FDCM) अधिकाऱ्यांना व डायल ११२ च्या माध्यमातून पोलिसांना कळवण्यात आले. माहिती मिळताच बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार संदेश वाघमारे, मोहन निषाद, पोलीस अंमलदार अंकुश बुरांडे आणि कैलास आडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

या भीषण घटनेमुळे गिलबिली जंगल परिसरात बांबू कटाई व इतर कामांसाठी जाणाऱ्या मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षात आणखी एका मजुराचा बळी गेल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment